रोहा \ धनंजय कवठेकर : रोहा शहराच्या सांस्कृतिक इतिहासात एक नवे पर्व लिहिले जाणार आहे. लवकरच येथे भव्य डॉ. सी. डी. देशमुख नाट्यगृह प्रेक्षकांसाठी खुले करण्यात येणार आहे. या नाट्यगृहाच्या कामांची पाहणी आणि प्रगतीचा आढावा शुक्रवारी आमदार आदिती तटकरे व माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी घेतला.
या वेळी नाट्यगृहाच्या सुसज्ज बांधकामाची माहिती घेण्यात आल्यानंतर अत्याधुनिक साऊंड सिस्टीम, प्रकाशयोजना, रंगमंचाची सुविधा आणि प्रेक्षकांसाठी आरामदायक आसनव्यवस्था या बाबींवर विशेष भर देण्यात आला आहे.
आमदार आदिती तटकरे यांनी सांगितले की, हे नाट्यगृह म्हणजे रोह्याच्या सांस्कृतिक क्षेत्राला नवे बळ देणारा प्रकल्प आहे. स्थानिक कलाकार, नाट्यसंघ, विद्यार्थी आणि सांस्कृतिक संस्थांना आपली कला सादर करण्यासाठी आता एक दर्जेदार व्यासपीठ मिळणार आहे.
अनिकेत तटकरे यांनीदेखील या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत म्हटले की, रोह्याच्या विकासात सांस्कृतिक अधिष्ठान असणे गरजेचे होते. डॉ. सी. डी. देशमुख नाट्यगृह हे त्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
या नाट्यगृहामुळे रोह्यात संगीत, नाटक, काव्यवाचन, चर्चासत्रे यांसारख्या अनेक उपक्रमांना चालना मिळणार असून, स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. लवकरच उद्घाटनाची तारीख जाहीर होणार असून, रोह्याचे हे नवे सांस्कृतिक दालन सुसज्जतेने सज्ज होण्याच्या मार्गावर आहे.