पश्चिम बंगालमधील हत्येप्रकरणी डोंबिवलीत एकाला अटक

Maharashtra WebNews
0

  



मानपाडा पोलिसांची कामगिरी


डोंबिवली \ शंकर जाधव :   पश्चिम बंगालमध्ये दोन तरुणांनी एकाची गोळ्या घालून हत्या केली होती. या हत्येप्रकरणी तेथील पोलिसांनी एकाला अटक केली होती. मात्र हत्याच्या गुन्ह्यात साथ देणारा दुसरा आरोपी फरार होता. हा साथीदार डोंबिवलीत मजूर म्हणून काम करत होता. डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी त्याला अटक करून पश्चिम बंगालमधील पोलिसांच्या ताब्यात दिले.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिराज शाह उर्फ कॅप्टन असे डोंबिवलीत मजूर बनलेल्या हत्येच्या गुन्हातील आरोपी आहे. पश्चिम बंगाल राज्यातील हुगळी येथील डंकुनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेब्रुवारी महिन्यात बंटी साव या व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येतील मुख्य आरोपी अनिल साव याला पोलिसांनी बेड्या ठोकून गजाआड केले होते. मात्र त्याचा साथीदार  सिराज शाह हा पसार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते.


 पश्चिम बंगाल येथील डंकुनी पोलिसांनी मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांना याची माहिती दिली. कल्याण परिमंडळ -३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आरोपी सिराज याचा शोध घेत होते. मानपाडा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी महेश राळेभात यांच्या पथकाला एक माहिती मिळाली की, डोंबिवली एमआयडीसी भागात एक मजूर गेल्या दोन महिन्याापासून काम करतो आहे. तो पश्चिम बंगालचा आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सिराजला  ताब्यात घेतले. पश्चिम बंगालमधील हत्येच्या गुन्ह्यातील दुसरा आरोपी  सिराज शाह होता. मानपाडा पोलिसांनी सिराज शाहाला पश्चिम बंगाल पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)