शिवसैनिकांचे कल्याण दुर्गाडी किल्ल्यासमोर घंटानाद आंदोलन

 


प्रशासनाचा नोंदविला निषेध

कल्याण \  शंकर जाधव : बकरी ईदनिमित्त कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गा माता मंदिर तात्पुरते बंद करण्यात आले आहे.ज्यामुळे ठाकरेंची शिवसेना व शिवसेना ( शिंदे गट  ) यांनी  निषेध व्यक्त केला. भाविकांना मंदिरात घंटा वाजवण्यास आणि दर्शन घेण्यास मनाई केल्याने संताप व्यक्त होत होता.      

  आजही प्रशासन एका विशिष्ट समुदायाच्या धार्मिक भावनांची काळजी घेत दुसऱ्या समुदायाच्या हक्कांचे उल्लंघन करत असल्याचे यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी सांगितले. निषेध करण्याकरता शनिवारी  दोन्ही गटातील शेकडो शिवसैनिक दुर्गाडी किल्ल्याजवळ जमले आहेत. 

 माजी नगरसेवक महेश गायकवाड म्हणाले,  घंटानाद आंदोलन परंपरा शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर स्व.आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली ३९ वर्षांपासून सुरू आहे. बकरी ईदला येथील मंदिराला टाळे लावले जाते.शिवसैनिकांनी किल्ल्यावर पोहोचण्याकरता खूप प्रयत्न केले. पण पोलिसांनी आम्हाला जाऊ दिले नाही. त्यामुळे मी प्रशासनाचा निषेध करतो.


दरम्यान, बकरी ईद दिवशी मुस्लिम बांधव किल्ला परिसरात नमाज अदा करतात. त्यामुळे संभाव्य तणाव टाळण्यासाठी पोलिसांनी किल्ल्याकडे जाणारे रस्ते बंद केले आहेत. निदर्शकांना रोखण्यासाठी लाल चौकी परिसरात पोलिस बॅरिकेड्स लावले होते. बकरी ईद असल्याने परिसरात मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती.

 कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू आणि मुस्लिम दोघांसाठीही धार्मिक स्थळे आहेत आणि दोघांनीही त्यांचे हक्क सांगितले आहेत.हे प्रकरण न्यायालयातही सुरू आहे. बकरी ईदनिमित्त मुस्लिम समाजाचे लोक सकाळी नमाज पठण करतात आणि हिंदूंना मंदिरात जाऊन आरती आणि पूजा करण्यापासून रोखले जाते. दोन्ही धर्मांमध्ये कोणताही वाद होऊ नये आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी  पोलिस कडक बंदोबस्तात हिंदूंना मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखतात. धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने १९८६ मध्ये हे आंदोलन सुरू केले. तेव्हापासून दरवर्षी बकरी ईदनिमित्त शिवसैनिक कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यासमोर निदर्शने करत आहेत.

यावेळी शिवसेना ( शिंदे गट ) कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे , आमदार विश्वनाथ भोईर, माजी नगरसेवक महेश पाटील, अरविंद मोरे यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post