मीनल करनवाल यांचा तात्काळ पुढाकार घेऊन कारवाई
नशिराबाद (जळगाव): उर्दू माध्यमिक शाळेतील ८० विद्यार्थ्यांचे अकरावीचे प्रवेश अनिश्चिततेत अडकले असतानाच, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल (IAS) यांनी तात्काळ लक्ष घालत विद्यार्थ्यांचे शिक्षण वाचवणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. यामुळे शेकडो पालक आणि विद्यार्थी यांचे भवितव्य पुन्हा रुळावर आले आहे.
शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक काही कारणास्तव विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी आवश्यक असलेले शाळा सोडलेले दाखले (Leaving Certificates) देत नव्हते. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षण प्रवास थांबण्याच्या उंबरठ्यावर आला होता. वेळेत दाखले न मिळाल्यास अकरावी प्रवेश गमावण्याची भीती उभी राहिली होती. या प्रकाराची माहिती मिळताच जिल्हा परिषदेच्या CEO मीनल करनवाल यांनी तात्काळ पोलीस संरक्षणात शाळेचे कुलूप उघडून कारवाई केली. शाळेतील कागदपत्रांची पाहणी करून, विद्यार्थ्यांना तत्काळ आवश्यक दाखले प्रदान करण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांचे प्रवेशाचे मार्ग मोकळे झाले.
प्रभारी मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ मांडल्याचे स्पष्ट होताच, त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा प्रकार केवळ शैक्षणिक दडपशाहीचा नाही, तर एका संपूर्ण पिढीच्या भविष्याशी केलेला अन्याय मानला जात आहे.
मीनल करनवाल यांची ही तत्परता आणि जनतेच्या हितासाठी घेतलेली कणखर भूमिका अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शिक्षणाचा अधिकार प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत हक्क आहे, हे कृतीतून सिद्ध करणारा हा निर्णय संपूर्ण जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरत आहे. ८० विद्यार्थ्यांचे अकरावी प्रवेश आता निश्चित झाले असून, त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला पुन्हा गती मिळाली आहे. पालकांच्या डोळ्यांतून समाधानाश्रू वाहताना दिसले, तर विद्यार्थ्यांनी "धन्यवाद मॅडम" असे म्हणत कृतज्ञता व्यक्त केली.