नेरूळ : नवी मुंबईतील नेरूळ सेक्टर ४४ ए भागातील भूखंड क्र. ५ ते ९ येथे अनधिकृतपणे सुरू असलेल्या ‘आऊट स्टे हॉटेल अँड अपार्टमेंट’ या लॉजिंग अँड बोर्डिंग व्यवसायावर नवी मुंबई महानगरपालिकेच्या पथकाने धडक कारवाई करत ती आस्थापना सीलबंद केली.
ही कारवाई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या देखरेखीखाली, बेलापूर विभागाचे सहायक आयुक्त डॉ. अमोल पालवे, परवाना विभागाच्या सहाय्यक आयुक्त शिल्पा देशपांडे आणि त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांनी नमुमपा पोलीस पथकाच्या मदतीने ही कारवाई ५ जून रोजी केली. या कालावधीत इमारतीच्या तळमजल्यापासून २३ व्या मजल्यापर्यंत असलेल्या एकूण ४३ व्यावसायिक रूम्स सीलबंद करण्यात आल्या. शिवाय, इमारतीवर लावलेला ‘आऊट स्टे हॉटेल अँड अपार्टमेंट’ असा अनधिकृत नामफलक देखील हटवण्यात आला.
या प्रकरणात महत्त्वाची बाब म्हणजे, महानगरपालिकेने यापूर्वीच १ एप्रिल रोजी नोटीस देऊन, संबंधित आस्थापनाला व्यवसाय परवाना घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानुसार मालकाने ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केला होता, मात्र भूखंडास संबंधित भोगवटा प्रमाणपत्र नसल्याने अर्ज नामंजूर करण्यात आला.
त्यानंतरही आस्थापना सुरूच ठेवण्यात आल्यामुळे, २० मे रोजी अंतिम नोटीस देत बंद करण्याचा आदेश देण्यात आला होता. पण मालकाने आदेशाचा अवमान केल्याने कायदेशीर कारवाई करत आस्थापना सीलबंद करण्यात आली.