मुंबई : राज्य सरकारच्या "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत मे महिन्याच्या सन्मान निधीचे वितरण सुरू करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंकड बँक खात्यांमध्ये उद्यापासून हा सन्मान निधी जमा केला जाणार आहे.
"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजना ही महिला सक्षमीकरण व सन्मानासाठीची ठोस पावले उचलणारी योजना असून, राज्यभरातील लाखो महिलांना या योजनेचा नियमित लाभ मिळतो आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना दरमहा दिला जाणारा हा सन्मान निधी त्यांच्या स्वाभिमानासाठी आणि गरजा भागविण्यासाठी महत्वाचा आधार बनला आहे.
महायुती सरकारचा दृढ निश्चय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचे सततचे मार्गदर्शन तसेच राज्यातील लाडक्या बहिणींचा सरकारवर असलेला विश्वास यामुळे ही योजना दमदारपणे पुढे जात आहे. भविष्यातही हाच विश्वास कायम ठेवून, अधिकाधिक महिलांपर्यंत योजना पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील.
योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दर महिन्याला ठराविक रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. लाभार्थ्यांच्या आधार कार्डशी संलग्न बँक खात्यांमध्ये या निधीचा थेट हस्तांतर पद्धत (DBT) वापरून व्यवहार केला जातो. हे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व तांत्रिकदृष्ट्या सक्षम असून निधी वितरणात कोणताही अडथळा येऊ नये याची दक्षता घेतली जात आहे.
लाभार्थ्यांसाठी आवश्यक सूचना:
- आपले आधार लिंकड बँक खाते तपासा.
- निधी जमा न झाल्यास जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधावा.
- मदतीसाठी अधिकृत हेल्पलाईन क्रमांक / पोर्टलवर चौकशी
राज्यातील कोट्यवधी महिलांचा आत्मसन्मान, सक्षमता आणि स्वावलंबन सुनिश्चित करण्याचे काम ही योजना करत आहे. ग्रामीण व शहरी भागातील महिलांमध्ये आत्मभान जागवणाऱ्या या योजनेची यशस्वी अंमलबजावणी ही महिला विकासाच्या दिशेने टाकलेले निर्णायक पाऊल आहे.