जान्हवी दांगेतीची ऑर्बिटल मिशनसाठी निवड

 


भारताच्या अवकाश संशोधनातील अभिमानाचा क्षण

पुणे : चंद्राचा पाठलाग करणाऱ्या छोट्या मुलीच्या स्वप्नांनी आज अवकाशाला गवसणी घातली आहे. अवघ्या १९ वर्षांच्या जान्हवी दांगेती हिने पोलंड येथे पार पडलेल्या १२ दिवसीय Analog Astronaut मिशनची यशस्वीरीत्या पूर्तता करून भारतातील सर्वात तरुण Analog Astronaut होण्याचा विक्रम प्रस्थापित केला होता. आता तिच्या अथक प्रयत्नांना आणि दृढ इच्छाशक्तीला मोठे फळ मिळाले असून तिला २०२९ मध्ये होणाऱ्या Titans Space च्या पहिल्या ऑर्बिटल मिशनसाठी Astronaut Candidate म्हणून निवडण्यात आले आहे.

जान्हवीच्या अवकाशयात्रेची सुरुवात अगदी लहानपणापासून झाली. चंद्र प्रत्येक रात्री तिचा पाठलाग करत असल्याची निरागस कल्पना करणारी ही छोटी मुलगी आज खऱ्या अर्थाने अवकाशाच्या दिशेने झेप घेत आहे. विज्ञान आणि अवकाश क्षेत्रातील तिच्या जिद्दी प्रयत्नांमुळे तिने विविध प्रशिक्षण कार्यक्रम आणि अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून स्वतःला सक्षम बनवले. पोलंडच्या Analog Astronaut मिशनमधील तिच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे ती जगाच्या नजरेत आली आणि त्याचा परिणाम म्हणजे तिला ऑर्बिटल मिशनसाठी निवडण्याची मोठी संधी मिळाली.

या निवडीमुळे केवळ जान्हवीचे नव्हे, तर भारताचे नाव अवकाश क्षेत्रात अभिमानाने उजळले आहे. तिच्या यशामुळे प्रत्येक स्वप्न पाहणाऱ्या भारतीय मुलामुलींसाठी ती प्रेरणेचे स्रोत ठरली आहे. भारताची कन्या अवकाशाच्या सीमा ओलांडण्याच्या तयारीत असताना भारताचा तिरंगा नव्या उंचीवर फडकणार आहे.

या ऐतिहासिक क्षणी भारताच्या प्रत्येक नागरिकाचा उर अभिमानाने भरून आला आहे. जान्हवीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत. तिची यशोगाथा स्वप्ने मोठी असावीत आणि त्यांना साकार करण्यासाठी अथक परिश्रम व श्रद्धा आवश्यक असते, हा संदेश देणारी ठरली आहे. भारताच्या अवकाश संशोधनाच्या इतिहासात हा क्षण सुवर्णाक्षरांनी नोंदला जाईल, यात शंका नाही.

Post a Comment

Previous Post Next Post