डोंबिवली \ शंकर जाधव : अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसाचा दर्जा मिळाला आहे. ही महाराष्ट्रासह संपूर्ण भारतासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची घटना आहे. शनिवार १२ तारखेला डोंबिवली पश्चिमेकडील सम्राट चौक येथील भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करत पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर जल्लोष करत कार्यकर्त्यानी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी' घोषणा दिल्या. यावेळी डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष पवन पाटील, अध्यक्षा प्रिया जोशी, सचिव डॉ. सर्वेश सावंत, हरीश जावकर, मयुरेश शिर्के यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी हरीश जावकर म्हणाले, आजचा दिवस प्रत्येक मराठी माणसाच्या अभिमानाचा आहे.मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया” या नावाने महाराष्ट्रातील ११ ऐतिहासिक किल्ले आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला आहे. हे केवळ जागतिक गौरवच नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा, शौर्याचा आणि स्वराज्य स्थापनेचा जागतिक सन्मान आहे.
कृष्णा पाटील म्हणाले, रायगड, राजगड, शिवनेरी, प्रतापगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, साल्हेर, खांदेरी आणि जिंजी या गडांमध्ये आजही त्या तेजस्वी इतिहासाची शौर्यगाथा झळकते. हे किल्ले म्हणजे फक्त दगडमातीचे बुरुज नाहीत, ते आपली ओळख, अस्मिता आणि अभिमान आहेत.या ऐतिहासिक कार्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. त्यांच्या नेतृत्वाखाली, आपला इतिहास जागतिक स्तरावर पोहोचत आहे. मयुरेश शिर्के म्हणाले, या किल्यांची जपणुकीची आणि संवर्धनाची जबाबदारी आपणही स्वीकारूया.