दिवा परिसरातील वाहतूक अडथळ्यांबाबत वंचित बहुजन आघाडीचे निवेदन सादर

Maharashtra WebNews
0

 


दिवा \ आरती परब : दिवा स्थानक परिसर, आगासन रोड आणि मुंब्रादेवी कॉलनी रोड या भागात गेल्या काही महिन्यांपासून वाहतूककोंडीचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळे रस्त्यावरून चालणेही कठीण झाले असून, नागरिक आणि प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी रस्त्यांवर गाड्यांची रांग लागते, परिणामी शाळकरी विद्यार्थी, कामगार, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे.


या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विकास इंगळे यांनी वाहतूक विभागास निवेदन सादर केले असून, या गंभीर समस्येवर ठोस आणि त्वरित उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, दिवा स्थानक परिसरात वाहतूक विभागाची टोइंग व्हॅन केवळ निवडक टू व्हीलर गाड्यांवरच कारवाई करते. परंतु फोर व्हीलर वाहनांचे अनधिकृत पार्किंगही तितकेच मोठे अडथळे निर्माण करत असूनदेखील त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. ही कारवाई निवडक आणि पक्षपाती स्वरूपाची असून, यामध्ये कोणतीही पारदर्शकता दिसून येत नाही, असा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.

नागरिकांमधूनही अनेक तक्रारी समोर आल्या आहेत की काही वेळा टोइंग कारवाईदरम्यान "चिरीमिरी" देवून गाड्या परत दिल्या जातात. या प्रकारांमुळे प्रशासनावर विश्वास उरणार नाही आणि जनतेमध्ये रोष वाढतो आहे. वंचित बहुजन आघाडीने यासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडली असून, अशी अनधिकृत आर्थिक देवाण-घेवाण थांबवावी, आणि टोइंगसह इतर कारवाई पारदर्शक पद्धतीने व्हावी, अशी मागणी केली आहे.


निवेदनात पुढील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत – अनधिकृत पार्किंगवर समान आणि पारदर्शक कारवाई करावी, फक्त टू व्हीलर नव्हे तर फोर व्हीलरवरही कठोर पावले उचलावीत, चिरीमिरीसारख्या गैरप्रकारांवर बंदी आणून कारवाईची नियमित माहिती जनतेसमोर मांडावी. यासोबतच विभागीय अधिकाऱ्यांनी स्वतः दिवा परिसराची पाहणी करून वस्तुस्थितीची माहिती घ्यावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे.


या मागण्यांकडे सात दिवसांत गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही, तर वंचित बहुजन आघाडी स्थानिक पातळीवर आंदोलन छेडेल, असा इशारा देखील या निवेदनात देण्यात आला आहे. दिवा परिसरात वाढती वाहतूक समस्या आणि त्यामुळे निर्माण होणारी अस्वस्थता पाहता, ही मागणी केवळ राजकीय नव्हे, तर सामान्य नागरिकांच्या हक्कांसाठीची भूमिका आहे. वाहतूक विभागाने तातडीने कारवाई हाती घेऊन समस्या सोडवावी, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)