ठाणे महापालिकेला १० कोटींचा दंड

Maharashtra WebNews
0


दिवा डंपिंग ग्राऊंडप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका

दिवा \ आरती परब: दिवा प्रभागातील डंपिंग ग्राऊंडमध्ये गेल्या सात वर्षांपासून (२०१६ ते २०२३) ठाणे महापालिकेकडून सातत्याने बेकायदेशीरपणे कचरा टाकण्यात येत होता. यामुळे परिसरातील जैवविविधतेचे, विशेषतः खारफुटीचे मोठे नुकसान झाले असून, दुर्गंधी, लीचेट्समुळे भूजलप्रदूषण आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) ठाणे महापालिकेला तब्बल ₹१०.२ कोटींचा दंड ठोठावला आहे.

ही कारवाई म्हणजे दिवा परिसरातील जनतेचा सातत्यपूर्ण संघर्ष आणि पर्यावरण प्रेमी संस्था वनशक्ती फाउंडेशनचे संस्थापक स्टॅलिन दयानंद यांचे अथक प्रयत्न यांचे फलित आहे. या लढ्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षही कायम पाठीशी राहिला असून, सुरुवातीपासूनच या प्रश्नावर आवाज उठवत आला आहे.

या कारवाईविषयी प्रतिक्रिया देताना शिवसेना (उबाठा) कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे म्हणाले, “आजची ही कारवाई म्हणजे जनतेच्या आवाजाची दखल आहे. टीएमसीने केवळ पर्यावरणाची नव्हे, तर नागरिकांच्या आरोग्याची आणि मूलभूत हक्कांचीही पायमल्ली केली आहे.”

या संपूर्ण प्रकरणात पुढील मागण्या ठामपणे करण्यात आल्या आहेत: डंपिंग ग्राउंड परिसरातील सर्व बेकायदेशीर कचरा तात्काळ हटविण्यात यावा, प्रदूषित भूजल आणि परिसराचे वैज्ञानिक पुनर्वसन करावे, आरोग्यास धोका निर्माण झालेल्या परिसरातील नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय शिबिरे आयोजित करावीत, जबाबदार अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करावी, तसेच भविष्यात अशा प्रकारचा पर्यावरण विनाश टाळण्यासाठी पारदर्शक आणि जनतेच्या सल्ल्याने धोरण आखावे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नेहमीच पर्यावरण रक्षण, सार्वजनिक आरोग्य आणि प्रशासनाची जबाबदारी या मुद्यांवर प्रामाणिकपणे काम करत आला असून, यापुढेही दिवा व परिसरातील जनतेच्या प्रत्येक संघर्षात आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असेही रोहिदास मुंडे यांनी स्पष्ट केले.









Post a Comment

0Comments

Post a Comment (0)