दिव्यात ठाकरे गटात नाराजीचे सूर

Maharashtra WebNews
0

 


पक्षवाढीस धोका निर्माण होण्याची शक्यता

दिवा \ आरती परब : दिवा शहरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात गेल्या काही काळापासून नाराजीचा सूर अधिकच तीव्र होत आहे. संघटन बळकट करण्याच्या ऐवजी कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आणि उपेक्षेची भावना वाढीस लागली असून, हेच भविष्यात पक्षासाठी मोठ्या अडचणीचे कारण ठरू शकते, अशी चर्चा सध्या शहरभर सुरू आहे.

निष्ठावान आणि वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलले जात असून, शहरप्रमुखांकडून केवळ अत्यंत निकटवर्तीय, स्वतःच्या हितसंबंधांशी निगडित असलेल्या व्यक्तींनाच पदे दिली जात असल्याचे आरोप थेट पातळीवर होऊ लागले आहेत. परिणामी, अनेक जुने व अनुभवी कार्यकर्ते निराश होऊन मागे सरकताना दिसत आहेत. पक्ष वाढीसाठी झटणाऱ्यांच्या हातात काहीच नसल्याची भावना अधिक तीव्र होत चालली आहे.

शहरात आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांचा संदर्भ लक्षात घेता, ही अवस्था पक्षासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. संघटन बळकट करण्याऐवजी, वरिष्ठ पातळीवरून स्थानिक पातळीवर होणाऱ्या कार्यपद्धतीकडे डोळेझाक केली जात असल्याचे स्पष्ट चित्र उमटत आहे. नगरसेवक निवडून येण्याऐवजी, आपले गट मजबूत ठेवणे आणि आपल्याच मोजक्या लोकांच्या हितासाठी राजकारण करणे – हीच दिशा शहरप्रमुखांकडून घेतली जात असल्याची कार्यकर्त्यांत तीव्र भावना आहे.

या पार्श्वभूमीवर, दिवा, कळवा आणि मुंब्रा या भागांतील कार्यकर्त्यांसाठी सुमित हॉल येथे एकत्रित बैठक घेण्यात आली. मात्र ही बैठक फक्त औपचारिकतेपुरती मर्यादित राहिली. कार्यकर्त्यांच्या मूळ तक्रारी, प्रश्न, आणि मनातील नाराजी दूर करण्यासाठी कोणताही ठोस प्रयत्न केला गेला नाही. उलट, प्रश्न विचारणाऱ्यांना डावलले जात असल्याची भावना अधिकच खोलवर रुजली आहे.

हा कार्यकर्ता मेळावा केवळ नाराज कार्यकर्त्यांच्या जखमेवर मलम लावण्याचा प्रकार वाटतो, असा थेट सूर अनेक कार्यकर्त्यांनी बैठकीनंतर व्यक्त केला. "आपण बाजूला पाडले जात आहोत" ही भावना कार्यकर्त्यांमध्ये प्रबळ होत चालली आहे. या भावना वेळेत हाताळल्या गेल्या नाहीत, तर अनेक वर्षांच्या निष्ठेचा आणि योगदानाचा नाश होऊन पक्षाची मुळेच उखडण्याची शक्यता निर्माण होईल.

या संपूर्ण पार्श्वभूमीकडे पाहता, वरिष्ठ नेतृत्वाने या नाराजीची गंभीर दखल घेणे अत्यावश्यक बनले आहे. तातडीने हस्तक्षेप करून सर्व थरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणे, आणि पक्षवाढीस प्राधान्य देणारे निर्णय घेणे हीच काळाची गरज आहे. अन्यथा, या असंतोषाचे पर्यवसान येणाऱ्या निवडणुकांमध्ये गंभीर राजकीय नुकसानीत होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Tags : #शिवसेना_उद्धवगट #दिव्यातीलराजकारण #कार्यकर्त्यांचीनाराजी #PoliticalReality #GrassrootVoices #UddhavThackeray #DivaPolitics #PartyWorkerVoices #LocalLeadershipCrisis




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)