नागरिकांमध्ये नाराजी
दिवा \ आरती परब : सोमवारी विधानभवनात पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरातील अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले. तसेच अनधिकृत बांधकामांना पाठिशी घालणाऱ्या संबंधित पालिका अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, या आदेशांनंतरही दिवा परिसरात पालिकेची केवळ दिखाव्यापुरती कारवाई झाल्याचे चित्र आहे.
आज दिवा प्रभागातील पाच ठिकाणी कारवाई करण्यात आली. एका ठिकाणी केवळ पायऱ्यांचा जिना, तर दुसऱ्या ठिकाणी प्लिंथ पातळीवरचे बांधकाम आणि रिकाम्या रुमच्या भिंती पाडण्यात आल्या. एका ठिकाणी अर्धा तळमजला पोकलेनच्या सहाय्याने तोडण्यात आला. कारवाईसाठी ६ पोकलेन आणि ६ ट्रॅक्टर आणले गेले होते. मात्र प्रत्यक्षात कारवाईचे स्वरूप अत्यंत मर्यादित होते.
नागरिकांनी केलेल्या निरीक्षणानुसार, जिथे कारवाई झाली त्याच परिसरात ४ ते ५ मजल्यांचे ५- ६ अनधिकृत इमारतींचे बांधकाम सुरू होते, मात्र त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे पालिकेची ही कारवाई म्हणजे केवळ दिखावा असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. यावेळी दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त शिवराज नागरगोजे, ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त सचिन सांगळे आणि उपायुक्त मनिष जोशी हे देखील उपस्थित होते.
दिवा शीळ आणि मुंब्र्यातील खान कंपाऊंड येथे जशी मोठ्या प्रमाणात अनधिकृत इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या, तशी ठोस कारवाई दिव्यात मात्र झाली नाही, याकडे नागरिकांनी नाराजीने लक्ष वेधले आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, "अनधिकृत बांधकामांवर खरोखरची आणि पारदर्शक कारवाई झाली पाहिजे, अन्यथा हे आदेशही औपचारिकते पुरतेच राहतील."