दूषित पाण्याविरोधात अनोखा एल्गार
डोंबिवली \ शंकर जाधव : कल्याण पूर्व भागात नागरिकांना मिळणाऱ्या दूषित पाण्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) बुधवार, १६ जुलै रोजी केडीएमसीच्या 'ड' प्रभाग कार्यालयात अनोख्या पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. मनसैनिकांनी अंगात केवळ टॉवेल आणि बनियान घालून निषेध व्यक्त करत या प्रश्नाची तीव्रता अधोरेखित केली.
कल्याण पूर्व भागातील अनेक वसाहतींमध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्वचारोग, पोटदुखी, जुलाब अशा समस्या वाढत असतानाही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, असा आरोप मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला.
या पार्श्वभूमीवर मनसैनिकांनी टॉवेल आणि बनियान घालून ‘ड’ प्रभाग क्षेत्र कार्यालयात अनोखे आंदोलन केले. या वेळी त्यांनी "दूषित पाणी बंद करा", "स्वच्छ पाणी आमचा हक्क आहे" अशा घोषणा देत निषेध नोंदवला. आंदोलनाचे नेतृत्व करताना मनसे कार्यकर्ते योगेश गव्हाणे म्हणाले की, “कल्याण पूर्व भागात अनेक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असून, शासन व प्रशासन दोघांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. मंत्रालयात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमध्ये शिळे अन्न दिल्यामुळे टॉवेल-बनियान घालून कर्मचाऱ्याला जाब विचारला होता, त्याच प्रतीकेचा वापर करत आम्ही येथे आंदोलन करत आहोत.”
गव्हाणे यांनी नागरिकांना आवाहन करत सांगितले की, “आगामी निवडणुकांमध्ये असे नगरसेवक निवडा जे तुमचे प्रश्न ऐकतील आणि त्यावर ठोस काम करतील. सध्याचे प्रतिनिधी अपयशी ठरले आहेत.” त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली की, सर्व पाईपलाईन्सची तपासणी करून दूषित पाण्याचा स्रोत बंद करावा आणि स्वच्छ पाणीपुरवठा तातडीने सुरू करावा.
मनसेच्या या आंदोलनाचे व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले असून अनेक नागरिकांनी या पद्धतीला पाठिंबा दर्शवला आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली पाहिजे आणि जनतेच्या आरोग्याशी संबंधित या प्रश्नावर तातडीने कार्यवाही केली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.