ठाणे व बदलापुरात संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत

   


ठाणे / बदलापूर :  गुरुवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे ठाणे व बदलापूर परिसरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. एकीकडे ठाण्यात ठिकठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूककोंडी निर्माण झाली, तर दुसरीकडे बदलापुरात उल्हासनदी दुथडी भरून वाहू लागल्याने नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच झालेल्या या मुसळधार पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे.


शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत ठाण्यात ४४ मिमी पावसाची नोंद झाली, तर दुपारी ४.३० पर्यंत ही मात्रा ५९.३० मिमीवर पोहोचली. परिणामी शहरातील कोपरी पूल, मुलुंड टोलनाका, माजिवडा, तीन हात नाका, खारेगाव टोलनाका, साकेत परिसर अशा प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. ठाणे वाहतूक पोलिसांनी काही वाहिन्यांचे मार्ग बदलून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ठाण्याकडे येणाऱ्या वाहनांना अरुंद रस्त्यांमुळे अडचणींचा सामना करावा लागला.


शहरातील अनेक भागांतील रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडले असून, त्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. यावर्षी आतापर्यंत ठाण्यात केवळ १४२८ मिमी पावसाची नोंद झाली आहे, जी गेल्या वर्षाच्या तुलनेत ७०० मिमीने कमी आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


संरक्षक भिंती कोसळल्या

विटावा (कळवा) आणि पोखरण रोड नं. १ येथे दोन ठिकाणी संरक्षक भिंती कोसळल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने तत्काळ घटनास्थळी जाऊन राडारोडा हटवून मार्ग मोकळा केला.



बदलापुरात उल्हासनदीच्या पाणीपातळीत वाढ

बदलापुरात गुरुवारी रात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली असून, उल्हासनदी दुथडी भरून वाहत आहे. नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने सखल भागांतील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. शुक्रवारी दुपारी १२ वाजता नदीची पातळी १३ मीटर होती, तर संध्याकाळी ५.१५ वाजेपर्यंत ती १५.८४ मीटर झाली होती. उल्हासनदीसाठी इशारा पातळी १६.५० मीटर आणि धोक्याची पातळी १७.५० मीटर इतकी आहे. कल्याण-बदलापूर रस्त्यावर फॉरेस्ट नाका ते बदलापूर प्रवेशद्वार या दरम्यान अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. बदलापूर पूर्वेकडील उड्डाणपुलाखाली आणि कात्रप मार्ग तसेच मच्छी मार्केटजवळील अंडरपासमध्ये पाणी साचल्याने तो पूर्णपणे बंद करण्यात आला.

मे महिन्यातदेखील अचानक आलेल्या पावसामुळे उल्हासनदीला पूर आला होता. गेल्या दोन दिवसांतील जोरदार पावसामुळे पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेषतः माथेरान, नेरळ, खोपोली परिसरात झालेल्या पावसामुळे उपनद्यांमधून उल्हासनदीत मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे.



नगर परिषद प्रशासन अलर्टवर

परिस्थिती गंभीर होऊ नये यासाठी कुळगाव-बदलापूर नगर परिषद प्रशासन सतर्क झाले असून, मुख्याधिकारी मारुती गायकवाड स्वतः परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज असून, नदीकाठच्या वस्त्यांमध्ये सतत पेट्रोलिंग सुरू आहे.




 प्रशासनाकडून सतर्कतेचे निर्देश

राज्यातील हवामान विभागाने पुढील ४८ तासांत ठाणे, रायगड, नवी मुंबई, पालघर, अलिबाग आणि बदलापूर परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभाग, नगर परिषद, पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभाग २४ तास कार्यरत असून, नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, नदीकाठच्या भागांपासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




Post a Comment

Previous Post Next Post