मुंबईत मुसळधार पावसाचा कहर





अंधेरी सबवे तीनदा बंद, विमान वाहतूक व रस्त्यांव वाहतूक विस्कळीत

मुंबई : शुक्रवारी मुंबईकरांना पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा तडाखा बसला. शहर व उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळल्यानं अनेक भागांत पाणी साचून वाहतूक ठप्प झाली. विशेषतः खालवस्तीत राहणाऱ्या भागांत पाण्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. दरम्यान, अंधेरी सबवे दिवसभरात तब्बल तीन वेळा वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. मुंबईतील एकूण ४८१ पाणीनिःसारण पंपांपैकी ३४० पंप कार्यान्वित करून पाणी उपसण्याचे काम सुरु आहे.

गुरुवार रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने शुक्रवारीही दमदार हजेरी लावली. उपनगरांमध्ये विशेषतः पावसाचा जोर जास्त होता. गुरुवार सायंकाळी ७ वाजल्यापासून ते शुक्रवार सायंकाळी ७ वाजेपर्यंतच्या १२ तासांच्या कालावधीत अंधेरी (मालपा डोंगरी) येथे सर्वाधिक १२२ मिमी पावसाची नोंद झाली. अंधेरी वेस्ट (के वेस्ट वॉर्ड कार्यालय) येथे ११२ मिमी, गोरेगाव (आरे रोड) १०७ मिमी, सांताक्रूझ (नारियलवाडी) १०९ मिमी, बीकेसी (फायर स्टेशन) १०३ मिमी, घाटकोपर (रामाबाई नगर) १०५ मिमी, विक्रोळी (टागोर नगर) १०२ मिमी, तर पवई (MCMMCR) येथे १०३ मिमी पावसाची नोंद झाली.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (CSMIA) विमान वाहतूकही विस्कळीत झाली असून, Flightradar24 च्या माहितीनुसार विमानतळाचा ‘डिसरप्शन इंडेक्स’ २.८ इतका नोंदवण्यात आला, जो मध्यम स्वरूपाच्या विलंबाचा निर्देश देतो. सरासरी उड्डाण विलंब ३४ मिनिटांपर्यंत पोहोचला. इंडिगोने आपल्या प्रवाशांसाठी सूचना देत म्हटले की, “आम्ही आकाशावर नियंत्रण ठेवू शकत नाही, पण जमिनीवर तुमची यात्रा सुरळीत ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.” त्याचप्रमाणे आकासा एअरनेही आपल्या प्रवाशांना विमानतळाकडे जाताना अतिरिक्त वेळ नियोजनात घ्यावा, असे आवाहन केले आहे.

दरम्यान, उपनगरीय रेल्वे सेवेवर फारसा परिणाम झालेला नाही. पश्चिम रेल्वेने सर्व गाड्या वेळापत्रकानुसार सुरू असल्याचे सांगितले, तर मध्य रेल्वेच्या काही मार्गांवर ८ ते १० मिनिटांचा उशीर नोंदवण्यात आला आहे. BESTच्या बस सेवा बहुतांश मार्गांवर सुरळीत सुरू होत्या, तरी काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे मार्ग वळवावे लागले.

भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी शनिवारी ऑरेंज अलर्ट, तर पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील ४८ तासांत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोबतच ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने झंझावाती वारे वाहण्याचा अंदाजही देण्यात आला आहे. कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस व किमान तापमान २४ अंश सेल्सिअस इतके असण्याचा अंदाज आहे.

महापालिकेकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, अनावश्यक प्रवास टाळावा, पाण्याने भरलेल्या रस्त्यांवर जाणे टाळावे, आणि कोणताही अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




Post a Comment

Previous Post Next Post