आमदार राजेश मोरे यांनी विचारला महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब
डोंबिवली \ शंकर जाधव : डोंबिवलीसह कल्याण ग्रामीण परिसरात सतत वीजपुरवठा खंडित होणे, नव्याने करण्यात आलेले काँक्रीट रस्ते महावितरणच्या कामासाठी पुन्हा खोदून ठेवणे, डीपी बॉक्सची झाकणे न बसविणे, ओव्हरहेड वायर सुरक्षा संदर्भात गंभीर दुर्लक्ष करणे, नागरिकांनी फोन करूनही त्यावर प्रतिसाद न देणे, तक्रारीचा कॉल न घेणे, नियोजित वेळेत दुरुस्तीचे काम पूर्ण न करणे आदी समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. या तक्रारींचा समाचार घेण्यासाठी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश मोरे यांनी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांसह महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन थेट जाब विचारला.
या बैठकीत आमदार मोरे यांनी महावितरणच्या हलगर्जीपणावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत, नागरिकांच्या समस्या आणि गैरसोयींची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांसमोर मांडली. येत्या पंधरा दिवसांत या तक्रारींवर योग्य ती कार्यवाही न झाल्यास 'शिवसेना स्टाईल'ने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या बैठकीस कल्याण तालुकाप्रमुख महेश पाटील, माजी नगरसेवक नितीन पाटील, एकनाथ पाटील, कल्याण तालुका सचिव बंडू पाटील, महिला आघाडी जिल्हा संपर्क संघटक कविता गावंड, युवा सेना डोंबिवली शहरप्रमुख सागर जेधे, विभागप्रमुख तेजस पाटील, संजय विचारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
महावितरण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना होणारा त्रास आणि दैनंदिन जीवनातील अडथळे या बैठकीत स्पष्टपणे मांडण्यात आले. वीजपुरवठा नियमित करणे, खोदलेले रस्ते वेळेवर दुरुस्त करणे, डीपी बॉक्स व्यवस्थित झाकणे, ओव्हरहेड वायरचा धोका दूर करणे तसेच नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ प्रतिसाद देणे यासह इतर बाबींबाबत ठोस पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी आमदार राजेश मोरे यांनी अधिकाऱ्यांकडे केली.
