ठाणे : ठाण्यातील कॅडबरी जंक्शन परिसरात शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात कर्तव्यावर जात असलेले पोलीस शिपाई सुरेश भालेराव (राहणार –शिवाईनगर, ठाणे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव डम्परने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर ते रस्त्यावर कोसळले आणि डम्परच्या मागील चाकाखाली येऊन गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी आणि उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने मदत केली. मात्र अॅम्ब्युलन्स वेळेवर पोहोचली नाही, यामुळे उपस्थित पोलिसांनीच ऑटो-रिक्शा थांबवून त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवले. मात्र त्यावेळी उशीर झालेला होता. यामुळे पोलीस दलासह नागरिकांमध्ये आरोग्य यंत्रणेच्या अपयशाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मृत पोलीस शिपाईचे नाव सुरेश भालेराव असून ते २००७ साली महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाले होते. सध्या ते ठाणे पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले आणि कुटुंबीय आहेत. त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
या अपघाताबाबत राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, डम्पर चालक राजकुमार चौधरी याला अटक करण्यात आली आहे. संबंधित डम्पर वर्तक नगरहून माजीवाडाकडे जात होता आणि त्यात कोणताही माल नव्हता. अपघातानंतर डम्पर चालक पळून गेला होता, मात्र पोलिसांनी काही तासांत त्याला अटक केली. या प्रकरणी डम्पर ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
स्थानिकांची मागणी
या दुर्घटनेनंतर कॅडबरी जंक्शन परिसरात वाहतुकीचे काटेकोर नियोजन, तसेच वाहनचालकांवर कडक नियंत्रण आणावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. पोखरण रोड नं. १ च्या हद्दतील वर्तक नगर ते कॅडबरी जंक्शन पर्यंतचा रस्ता नेहमीच व्यस्त असतो. या परिसरात शाळा असल्यामुळे मुलांना नेण्या आणि सोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात पालक खासगी वाहन आणतात, आणि रस्त्यातच वाहने पार्क करत असल्यामुळे वाहतूककोंडी ही नेहमीची डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवांना देखील याचा फटका बसतो.त्यामुळे हा रस्ता वाहतूककोंडी मुक्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.