पन्हाळगडाच्या जतन-संवर्धनासाठी शासनाचा ठोस पुढाकार

Maharashtra WebNews
0

 


पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची घोषणा

कोल्हापूर \ शेखर धोंगडे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यपूर्ण इतिहासातील अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या पन्हाळगडाचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत होणे ही कोल्हापूर जिल्ह्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. या ऐतिहासिक घटनानंतर, पन्हाळगडाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासन गंभीर असून, विशेष निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

पालकमंत्री आबिटकर यांनी आज पन्हाळा किल्ल्याला भेट देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरातील पुतळ्यास व शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ताराराणींच्या राजवाड्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी इतिहासावरील नव्या पिढीची समज वाढावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, मुख्याधिकारी चेतन कुमार माळी, माजी नगराध्यक्ष आसिफ मोकाशी व अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



पन्हाळगडाच्या विकासासाठी विशेष आराखडा तयार करण्यात येणार असून, तो लवकरच राज्य व केंद्र शासनास सादर करण्यात येईल, असे पालकमंत्री आबिटकर यांनी सांगितले. शिवरायांच्या युद्धनीतीत मोलाचे स्थान असलेला पन्हाळगड नव्या पिढीला प्रेरणा देणारा ठरावा, यासाठी किल्ल्याचा ऐतिहासिक व पर्यटकदृष्ट्या विकास करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

पालकमंत्री म्हणाले, “पन्हाळगडासह विशाळगडाचाही विकास केला जाईल. मात्र विकास करताना स्थानिक नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची पूर्ण काळजी घेण्यात येईल.  पन्हाळगडाचा जागतिक पातळीवरील गौरव हे केवळ एक ऐतिहासिक सन्मान नसून, कोल्हापूर जिल्ह्यासाठी पर्यटन, रोजगार आणि सांस्कृतिक समृद्धीची नवी दारे उघडणारा महत्त्वाचा टप्पा आहे. येत्या काळात किल्ल्याच्या संरक्षणासोबतच या ठिकाणी पर्यटकांसाठी भौतिक सोयीसुविधा, माहिती केंद्रे, इतिहासदर्शक फलक, इत्यादी सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.




Tags : #पन्हाळगड #Panhalgad #UNESCOWorldHeritage #ShivraiHistory #PrakashAbitkar #KolhapurTourism #HistoricForts #MaharashtraForts #PanhalgadDevelopment #MarathaGlory #ShivajiMaharaj


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)