निळजे-काटई-पलावा अर्धवट पुलाचे उद्घाटन; नागरिकांच्या सुरक्षेचा खेळखंडोबा
डोंबिवली \ शंकर जाधव : निळजे-काटई-पलावा उड्डाण पुलाच्या उद्घाटनाचा गाजावाजा सत्ताधाऱ्यांनी मोठ्या थाटात केला. शुक्रवारी ७ जुलै रोजी शिवसेना (शिंदे गट) तर्फे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत औपचारिक उद्घाटन पार पडले. मात्र काही तासांतच पुलावरचा डांबरीकरणाचा भाग घसरडा बनल्याने, अपघाताची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने हा पूल बंद केला. ही घटना केवळ निष्काळजीपणाच नव्हे, तर जनतेच्या जिवाशी खेळ असल्याचा आरोप नागरिकांनी आणि विरोधकांनी केला आहे.
या प्रकाराची माहिती मिळताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे कल्याण उपजिल्हाप्रमुख राहुल भगत यांनी घटनास्थळी भेट दिली. पाहणीनंतर त्यांनी प्रशासनावर आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत म्हटले, “घाईघाईत उद्घाटन करून तुम्ही जनतेच्या जिवाशी खेळता आहात. पुलावर बारीक खडी व भुसा टाकलेले दिसत आहे. हे अपघाताला निमंत्रण आहे. प्रशासनाने आणि राजकीय पक्षांनी आपापसातील श्रेयवाद बाजूला ठेवून जनतेचा विचार करावा.”
यावेळी सदाशिव गायकर, विजय भोईर, परेश पाटील, नेताजी पाटील आणि इतर शिवसैनिक उपस्थित होते. घटनास्थळी झालेल्या पाहणीत स्पष्ट दिसून आले की, पूल पूर्णत्वास आलेला नाही. तरीही सत्ताधाऱ्यांनी राजकीय चमकदारतेसाठी उद्घाटनाचे ढोल वाजवले आणि काही तासांतच ते मौनात गेले.