कल्याण : दरवर्षी पावसाळ्याच्या काळात अतिवृष्टीमुळे अनेक भागांमध्ये मलवाहिन्या चोकअप होऊन रस्ते पाण्याखाली जातात, परिणामी नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी काल सायंकाळी प्रत्यक्ष मैदानात उतरून मलवाहिन्यांच्या स्वच्छता व चोकअप निवारण प्रक्रियेची पाहणी केली.
महापालिकेच्या मलनिस्सारण विभागांतर्गत मलवाहिन्या आणि त्यावरील चेंबर्समधील गाळ काढणे व अडथळे दूर करण्याचे काम सुरू आहे. यासाठी महापालिकेकडे सध्या दोन आधुनिक यंत्रणा कार्यरत आहेत. एक शासनाकडून प्राप्त झालेली १८ टन क्षमतेची सक्शन व जेटिंग अॅन्ड रिसायकल मशीन, आणि दुसरी मे. Accord Water Tech या खासगी एजन्सीकडून कार्यान्वित ३१ टन क्षमतेची मशीनच्या सहाय्याने मलनिस्सारणाचे काम केले जात आहे.
या मशीनद्वारे कल्याण पश्चिमेतील संतोषीमाता रोड, एकविरा नगर तसेच डोंबिवली पूर्वेतील शिवमंदिर परिसरात चोकअप तक्रारी निवारणाचे काम सुरू आहे. या ठिकाणी चाललेल्या कामाची आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या.
पावसाळ्यात जलतारण रोखण्यासाठी आणि मलवाहिन्या सुरळीत राहाव्यात यासाठी महापालिकेने ही यंत्रणा सज्ज ठेवली असून, आयुक्तांच्या या प्रत्यक्ष दौऱ्यामुळे प्रशासन अधिक जागरूक व उत्तरदायी राहील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या दौऱ्यात महापालिकेचे यांत्रिक विभागाचे कार्यकारी अभियंता प्रविण पवार, जनसंपर्क व मलनिस्सारण विभागाचे उपअभियंता, तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.