लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी आणि शेवटची कसोटी सामन्यापूर्वी भारतीय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि ओव्हलचा मुख्य पिच क्युरेटर ली फोर्टिस यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाल्याची घटना घडली. सरावावेळी फोर्टिस यांनी पाहुण्या संघाला पिचपासून 2.5 मीटर अंतरावर उभे राहण्यास सांगितले आणि त्यावर गंभीर यांनी तीव्र प्रतिक्रिया देत, “तुम्ही आम्हाला काय करावं ते सांगू शकत नाही” असे कठोर शब्दांत सांगितल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले.
जी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “ग्राउंड स्टाफमधील एक जण आला आणि म्हणाला की तुम्ही पिचपासून २.५ मीटर दूर उभे राहा आणि दोरीच्या बाहेरून पिच पाहा. असं काही मी कधी पाहिलं नाही. मात्र याबाबत कोणतीही तक्रार करण्याची गरज नाही.”
कोटक यांनी स्पष्ट केले की भारतीय खेळाडू सरावावेळी स्पाईक्सऐवजी जॉगर बूट घालून होते, त्यामुळे पिचला नुकसान होण्याचा प्रश्नच नव्हता. “या सामन्यापूर्वीच आम्हाला माहित होतं की हा क्युरेटर काम करायला सोपा नाही. थोडं पझेसिव्ह असणं चांगलं पण इतकं नाही,” असे ते म्हणाले.
वादाची सुरुवात फोर्टिस यांनी गंभीर यांना “मी हे रिपोर्ट करणार” असे सांगितल्याने झाली. त्यावर गंभीर यांनी थेट उत्तर दिलं, “तुम्हाला जे रिपोर्ट करायचं आहे ते जा करून द्या.” त्यानंतर कोटक यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती शांत केली. या वादावेळी गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल आणि सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनाही उपस्थित होते.
या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून गंभीर यांनी फोर्टिसला स्पष्ट सांगितलं, “तुम्ही आम्हाला काय करायचं ते सांगू शकत नाही. तुम्ही फक्त ग्राउंड्समन आहात, त्यापेक्षा काही नाही.” वादानंतर दोघे वेगळ्या दिशेने निघून गेले आणि गंभीर यांनी सराव सत्रावर लक्ष केंद्रित केले.
फोर्टिस यांनी नंतर प्रतिक्रिया देताना सांगितले, “हा मोठा सामना आहे आणि तो (गंभीर) थोडासा संवेदनशील आहे.” दरम्यान, साई सुदर्शन, कुलदीप यादव आणि डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग हे खेळाडू मैदानात जोरदार सराव करताना दिसले.