गोव्याच्या रो-रो ट्रेनला नागरिकांचा थंड प्रतिसाद

Maharashtra WebNews
0

 


आठवडाभरात केवळ एकच बुकिंग

मुंबई :  मोठ्या जल्लोषात सुरू करण्यात आलेल्या कोकण रेल्वेच्या गोव्याला जाणाऱ्या देशातील पहिल्यारो-रो  (रोल-ऑन, रोल-ऑफ) ट्रेन सेवेला नागरिकांनी अधिक पसंती दिल्याचे दिसून येत नाही आहे. बुकिंगला सुरुवात होऊन आठवडा उलटला असून रविवारीपर्यंत कोकण रेल्वेकडे याबाबत केवळ ३८ चौकशा केल्याचे समोर आले असून त्यापैकी फक्त एका प्रवाशाने प्रवासासाठी बुकिंग केले आहे. ही ट्रेन सेवा २३ ऑगस्टपासून कोलाड (महाराष्ट्र) येथून आणि २४ ऑगस्टपासून वेरणा (गोवा) येथून सुरू होणार आहे.


कोकण रेल्वे प्रशासनाने सांगितले की, जर बुकिंग अपुरी (१६ कारपेक्षा कमी) असेल तर हा प्रवास रद्द केला जाईल आणि नोंदणी शुल्क परत केले जाईल. ४० कार वाहून नेण्याची क्षमता असलेली ही ट्रेन कोलाड ते वेरणा दरम्यान थेट धावणार आहे. मात्र प्रवासी विचारत असलेली रत्नागिरी, सावंतवाडी आदी प्रमुख स्थानके येथे कार लोडिंग व अनलोडिंगची सुविधा उपलब्ध नसल्याने रो-रो गाडी थांबणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापडी यांनी सांगितले की, १२ तासांचा रेल्वे प्रवास गर्दीच्या काळातील १० ते १२ तासांच्या रस्ते प्रवासापेक्षा वेळ वाचवत नाही. त्यातच कार लोडिंगसाठी व रिपोर्टिंगसाठी तीन तास आधी पोहचावे लागते. तसेच प्रति वाहन ७,८७५ रुपये आणि स्वतंत्र प्रवासी भाडे हा उच्च खर्च बहुतांश कुटुंबांना परवडणारा नाही. ही संकल्पना नाविन्यपूर्ण आहे, पण वेळ चुकीची आहे. हा उपक्रम डिसेंबरमध्ये नववर्षाच्या सुट्टीत जाहीर करायला हवा होता.


रेल्वे प्रवासी संघटनांनीही याबबत चिंता व्यक्त केली आहे की, रो-रो ट्रेनमुळे गणेशोत्सवासाठी धावणाऱ्या विशेष गाड्यांना फाटा द्यावा लागू शकतो. कारण या ट्रेनसाठी लोको पायलट, सहाय्यक, गार्ड, ट्रेन मॅनेजर अशा संपूर्ण कार्यकारी कर्मचाऱ्यांची व आधीच व्यस्त असलेल्या कोकण रेल्वे मार्गावरील एक संपूर्ण पथ द्यावा लागणार आहे.


सध्या मध्य रेल्वेने २५० आणि पश्चिम रेल्वेने ४४ गणेशोत्सव विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. त्यामुळे Ro-Ro ट्रेन सेवा सुरू ठेवावी की विशेष गाड्यांसाठी मार्ग मोकळा करावा, हा प्रश्न रेल्वे प्रशासनासमोर उभा राहिला आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)