इंग्लंडने सलग दुसऱ्यांदा युरो चषक पटकविला

Maharashtra WebNews
0



पेनल्टी  शूटआउटमध्ये स्पेनला पत्करावालागला पराभव


बासेल,( स्वित्झर्लंड ) :  महिला युरोपियन चषक २०२५ च्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पुन्हा एकदा आपली लढाऊ वृत्ती सिद्ध करत स्पेनचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा विजेतेपदावर नाव कोरले. हा सामना अतिरिक्त वेळेनंतर १-१- अशा बरोबरीत संपला आणि त्यानंतर झालेल्या पेनल्टी शूटआउटमध्ये इंग्लंडने ३-१ अशी निर्णायक आघाडी घेत स्पेनला हरवले. क्लो केली हिने निर्णायक पेनल्टी घेत इंग्लंडसाठी विजय निश्चित केला. तिने आत्मविश्वासाने मारलेला बॉल जाळ्यात घालून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. “मी शांत होते, आत्मविश्वासात होते आणि मला माहित होते की माझा शॉट जाळ्यात जाणार,” असे केलीने नंतर सांगितले.


गोलरक्षक हॅना हॅम्पटन हिने स्पेनच्या दोन प्रमुख खेळाडूंनी – मारिओना काल्डेंते आणि आईताना बॉनमती – मारलेल्या पेनल्टी अडवून संघाला निर्णायक वळण दिले. त्यानंतर साल्मा परालुएलो हिचा शॉट चुकला आणि इंग्लंडचा विजय निश्चित झाला.


स्पेनने सामन्याच्या २५व्या मिनिटाला ओना बाट्लेच्या पासवर काल्डेंतेने गोल करत आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या सत्रात इंग्लंडने जोरदार पुनरागमन केले. ५७व्या मिनिटाला क्लो केलीच्या डाव्या विंगवरून आलेल्या अचूक क्रॉसवर अलेसिया रुसो हिने डोक्याने सुंदर गोल करत सामना बरोबरीत आणला. संपूर्ण स्पर्धेत फक्त ४ मिनिटांसाठी मागे पडलेला स्पेन संघ या अंतिम सामन्यात पूर्ण वेळात एकदाही पिछाडीवर नव्हता, मात्र तरीही त्यांना युरो विजेतेपद गाठता आले नाही. 


स्पेनच्या प्रशिक्षक मोंत्से तोमे यांनी सांगितले, “या संघाने खूप मेहनत घेतली. अधिक संधी निर्माण केल्या, चांगला खेळ केला. पण कधी कधी फुटबॉलमध्ये हे पुरेसे नसते.” सामन्याच्या अतिरिक्त वेळेत स्पेनने इंग्लंडच्या पेनल्टी एरियामध्ये बरेच वेळ घालवले, मात्र निर्णायक फिनिश करण्यात अपयश आले. दुसरीकडे, इंग्लंडने याआधी इटली व स्वीडनविरुद्धही अशाच पद्धतीने संघर्ष करत विजय मिळवला होता.




स्पेनच्या गोलरक्षक काटा कॉल हिने इंग्लंडच्या कर्णधार लिया विल्यमस आणि बेथ मीड यांच्या पेनल्टी वाचवल्या. विशेष बाब म्हणजे मीडने पहिल्या प्रयत्नात दोन वेळा चेंडूला स्पर्श केल्यामुळे नियमांनुसार ती पेनल्टी परत मारावी लागली – पण अखेर इंग्लंडच्या बचावानेच सामना निर्णायक केला. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेली आईताना बॉनमती हिने स्पेनसाठी सर्वोत्तम खेळ केला. मात्र तिने सामना संपल्यानंतर म्हटले, “ही पराभवाची भावना क्रूर आहे. आम्ही खूप मेहनत घेतली, पण कधी कधी नशीब साथ देत नाही.”


इंग्लंडच्या प्रशिक्षक सरीना विगमन यांनी सलग तिसऱ्यांदा महिला युरोस्पर्धा जिंकवण्याचा इतिहास रचला. त्यांनी २०१७ मध्ये नेदरलँड्सला, २०२२ मध्ये इंग्लंडला आणि आता २०२५ मध्ये परदेशातही विजेतेपद मिळवून दिले. महिला प्रशिक्षक म्हणून त्यांनी युरोमध्ये सलग तीन विजेतेपदांची हॅट्ट्रिक केली आहे. महिला प्रशिक्षकांच्या आठव्या यशस्वी युरो स्पर्धेला त्यांनी गती दिली.


हा थरारक सामना सेंट-याकॉब पार्क स्टेडियम, बासेल (स्वित्झर्लंड) येथे खेळला गेला. विशेष बाब म्हणजे, दोन्ही देशांचे राजघराण्यातील सदस्यही हा सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. इंग्लंडकडून प्रिन्स विल्यम आणि प्रिन्सेस शार्लट, तर स्पेनकडून प्रिन्सेस लिओनोर आणि इन्फांता सोफिया या स्टेडियममध्ये उपस्थित होत्या.




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)