कोनेरू हम्पीला पराभूत करत FIDE विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू
वयाच्या 19व्या वर्षी बुद्धिबळाचा विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम
बातुमी (जॉर्जिया) : नागपूरच्या अवघ्या १९ वर्षीय दिव्या देशमुखने भारतीय बुद्धिबळ क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करताना FIDE Women’s Chess World Cup चे विजेतेपद पटकावले आहे. दिव्याने अंतिम सामन्यात अनुभवी कोनेरू हम्पीचा टायब्रेकरमध्ये पराभव करत ही कामगिरी साधली. यामुळे दिव्या ही या स्पर्धेची विजेती ठरणारी पहिली भारतीय महिला खेळाडू बनली आहे.
सलग २ दिवसांच्या अटीतटीच्या क्लासिकल डावांनंतर दोघींमध्ये १-१ अशी बरोबरी झाली होती. अखेर सोमवारच्या टायब्रेकर रॅपिड गेम्समध्ये निकाल लागला. पहिल्या रॅपिड डावात बरोबरी नोंदवल्यानंतर दुसऱ्या डावात काळ्या प्याद्यांनी खेळत दिव्याने विजय मिळवला. दुसऱ्या रॅपिड डावात अनुभवी हम्पी हिला वेळेच्या दडपणाखाली चूक झाली आणि ती तिचं प्यादं गमावून बसली. त्याचाच फायदा घेत दिव्याने आपली राणी सक्रीय केली आणि अखेर ७५ व्या चालीनंतर हम्पीने पराभव स्वीकारला.
हा विजय दिव्यासाठी अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरला आहे. यामुळे तिला 'ग्रँडमास्टर' ही सर्वोच्च बुद्धिबळ पदवी मिळाली असून, ती FIDE कँडिडेट्स स्पर्धेसाठीही पात्र ठरली आहे. ज्यातून अंतिमतः महिला विश्वविजेत्या पदासाठी स्पर्धा खेळता येते. कोनेरू हम्पी, वय ३८, हिचा बुद्धिबळात अनेक वर्षांचा अनुभव आहे. ती भारताची सर्वोच्च क्रमांकाची महिला खेळाडू आहे. तिच्यासारख्या दिग्गज खेळाडूविरुद्ध दिव्याने जेवढी आक्रमकता, संयम आणि रणनीती दाखवली, ती बुद्धिबळ क्षेत्रासाठी आश्वासक आहे.
दिव्याच्या या यशामुळे संपूर्ण देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. भारतीय बुद्धिबळ महासंघाने आणि महाराष्ट्र शासनानेही तिच्या या पराक्रमाचे अभिनंदन केले आहे. दिव्या देशमुखची ही कामगिरी भारतातील नव्या पिढीतील बुद्धिबळ खेळाडूंसाठी एक स्फूर्तीदायक उदाहरण ठरली आहे. या स्पर्धेच्या विजेतेपदासोबत दिव्याला $50,000 (सुमारे ₹४१ लाख) चे बक्षीस मिळाले. त्याचबरोबर तिने आता Candidates Tournament साठी पात्रता मिळवली आहे, जो पुढे जागतिक महिला बुद्धिबळ विजेतेपदासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.