कोकणातील चाकरमान्यांना मोफत प्रवासाची सुविधा
मुंबई : गणपती सणानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आमदार निलेश राणे यांच्या वतीने “शिवसेना एक्स्प्रेस” ही विशेष ट्रेन २५ ऑगस्ट २०२५ रोजी दादर ते कुडाळ दरम्यान धावणार आहे. या विशेष ट्रेनमधून प्रवाशांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कोकणात गणपतीला गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना दरवर्षी तिकिटांच्या समस्येला सामोरे जावे लागते. रेल्वे आणि एसटी बसमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे प्रवाशांना वेळेत गावी पोहोचणे अवघड होते. ही समस्या लक्षात घेऊन आमदार निलेश राणे यांनी खास प्रयत्न करून “शिवसेना एक्स्प्रेस” या विशेष ट्रेनची व्यवस्था केली आहे. या ट्रेनमुळे कुडाळ, मालवण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेशभक्तांना दिलासा मिळणार आहे.
ही विशेष ट्रेन दादर रेल्वे स्थानकातून २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सुटणार आहे. मुंबईतील चाकरमान्यांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक बोजा न पडता सोयीस्कर प्रवास मिळावा यासाठी प्रवास पूर्णपणे मोफत ठेवण्यात आला आहे. विनामूल्य तिकिटे बुकिंगसाठी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत खालील क्रमांकांवर संपर्क साधता येईल – 8652489964 आणि 8652272031.
“कोकणातील गणेशभक्तांना प्रवासात कोणताही त्रास होऊ नये आणि ते वेळेत घरी पोहोचावेत हा आमचा उद्देश आहे. त्यामुळेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही विशेष ट्रेन सोडण्यात येत आहे. सर्व गणेशभक्तांनी या मोफत सेवेचा लाभ घ्यावा.”
आमदार निलेश राणे
या विशेष ट्रेनमुळे मुंबईतील चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आनंददायी होणार असून गर्दीचा ताणही मोठ्या प्रमाणावर कमी होईल. गणेशभक्तांनी वेळेत संपर्क साधून आपली तिकिटे आरक्षित करून घ्यावीत, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.