महाराष्ट्र वीज नियामक आयोगाची मान्यता
भिवंडी : महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (MERC) महावितरणच्या ग्राहकांसाठी सुधारित वीज दर लागू करण्यास मंजुरी दिली असून हे दर १ जुलै २०२५ पासून अंमलात येणार आहेत. या बदलाबाबत टोरंट पावर कंपनीने रविवारी माहिती दिली. ही मान्यता २५ जून रोजी आयोगाने दिलेल्या आदेशानुसार आहे.
दरमहा ०-१०० युनिट्स वीज वापरणाऱ्या निवासी ग्राहकांना सुमारे ९% दरकपात होणार आहे. तर दरमहा १०० युनिट्सपेक्षा जास्त वापरणाऱ्या ग्राहकांच्या दरात ०.५% ते ३% पर्यंत किरकोळ वाढ केली जाईल. औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांचे फिक्स्ड चार्ज ४.५% ने वाढणार असून ऊर्जा शुल्क कमी होणार आहे. तसेच व्हीलिंग चार्ज १.१७ रुपये प्रति युनिटवरून १.४७ रुपये प्रति युनिट करण्यात आले आहेत.
१ जुलै २०२५ पासून २० kW पेक्षा जास्त लोड असलेल्या सर्व LT औद्योगिक, व्यावसायिक व सार्वजनिक सेवा ग्राहकांना kVAh युनिट्सवर आधारित बिल आकारले जाणार आहे. ऊर्जा शुल्क आता kWh ऐवजी kVAh युनिट्सवर लागू होईल, तसेच फिक्स्ड/डिमांड चार्जेसही आता kW ऐवजी kVA डिमांडवर आधारित असतील. ग्राहकांनी पॉवर फॅक्टर नियमित तपासणे, कॅपेसिटर किंवा APFC पॅनल लावून त्याची देखभाल करणे आवश्यक आहे. अन्यथा बिलात लक्षणीय वाढ होऊ शकते, असे टोरंट पावरने स्पष्ट केले आहे.
टाईम ऑफ डे (ToD) दररचनेतील बदल – एप्रिल ते सप्टेंबर या काळात सौर वेळेत (सकाळी ९ ते संध्याकाळी ५) वापरासाठी १५% ऊर्जा शुल्क सवलत मिळेल, तर ऑक्टोबर ते मार्च या काळात ही सवलत २५% असेल. कमाल वेळेत (संध्याकाळी ५ ते मध्यरात्री १२) औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना २५% अधिभार, तर इतर ग्राहकांना २०% अधिभार आकारला जाणार आहे. मध्यरात्री १२ ते सकाळी ६ दरम्यान लागू असलेली १.५० रुपये प्रति युनिट सवलत रद्द करण्यात आली आहे.
दरम्यान, बदल लागू होत असताना (३ ते ६ महिने) सिस्टम आणि मीटर अपग्रेड होईपर्यंत संध्याकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत वीज वापरासाठी १.३० रुपये प्रति युनिट अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. टोरंट पावरने सर्व ग्राहकांना आवाहन केले आहे की कोणत्याही शंका किंवा माहितीसाठी टोरंट पावरच्या कस्टमर केअर सेंटरशी संपर्क साधावा.