चौथ्या कसोटीतील उर्वरित सामना खेळणे अशक्य?
मँचेस्टर : भारताचा उपकर्णधार आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत पुन्हा एकदा दुखापतीच्या संकटात सापडला आहे. ओल्ड ट्रॅफर्ड येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, पंतने ३७ धावा करताना आपल्या उजव्या पायाला जबरदस्त दुखापत करून घेतली आणि त्याला मैदान सोडावे लागले.
पंतने क्रिस वोक्सच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू थेट त्याच्या उजव्या पायावर लागला. यामुळे पाय फुगून गेला आणि पंत वेदनांनी विव्हळू लागला. त्याला उभे राहणे देखील अशक्य झाले होते. डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला गोल्फ बग्गीने मैदानाबाहेर नेण्यात आले.
त्यानंतर पंतला प्रथम मैदानावरील वैद्यकीय केंद्रात, आणि नंतर रुग्णालयात स्कॅनसाठी हलवण्यात आले. या दरम्यान कर्णधार शुभमन गिलने त्याची विचारपूस केली.
त्यावेळी नॉन-स्ट्रायकर एंडवर असलेला बी. साई सुधर्शन म्हणाला, "ऋषभ खूप वेदनेत होता. स्कॅनचा अहवाल आल्यानंतरच पुढील चित्र स्पष्ट होईल." तो पुढे म्हणाला, "तो फलंदाज चांगल्या लयीत होता. जर तो पुन्हा खेळू शकला नाही, तर ते निश्चितच आमच्यासाठी मोठं नुकसान ठरेल."
पंतने याआधीच्या लॉर्ड्स कसोटीत देखील डाव्या हाताच्या बोटाला दुखापत घेतली होती. त्या वेळी ध्रुव जुरेलने यष्टीरक्षक म्हणून भूमिका बजावली होती.
पंतची आजची खेळी संयमित असली तरी त्यात त्याच्या खास शैलीचं दर्शनही झालं. जोफ्रा आर्चरवर त्याने एक स्लॉग स्वीप करून चौकार मारला, पण नंतर त्याच ओव्हरमध्ये रिव्हर्स स्वीप करताना अपघात झाला.
भारतीय संघाच्या दृष्टीने ही दुखापत मोठा धक्का ठरू शकते. पंतचा स्कॅन रिपोर्ट आणि वैद्यकीय निर्णयावर आता पुढील रणनीती अवलंबून असेल.
Tags : #ऋषभपंत #IndianCricket #IndvsEng #OldTraffordTest #TeamIndiaUpdates