जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांचा थेट दौरा
शहापूर : शहापूर तालुक्यातील अजनूप ग्रामपंचायतीच्या दापूर माळ आणि खोरगडेवाडी या अतिदुर्गम आदिवासी वाड्यांमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक छायादेवी सिसोदे आणि गटविकास अधिकारी बी. एच. राठोड यांनी थेट भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या समजून घेतल्या आणि तातडीच्या उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले.
या वाड्यांपर्यंत जाण्यासाठी कोणताही रस्ता उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना ५ किमीचा दगड-चिखलभरला रस्ता पार करत पायी प्रवास करावा लागतो. या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या क्षेत्रातून रस्ता काढण्यासंदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन घुगे यांनी दिले.
२०१६-१७ पासून २०२४-२५ पर्यंत मंजूर असलेल्या ३३ घरकुलांचे काम अद्याप सुरू नसल्याची बाब निदर्शनास आली. या घरकुलांच्या बांधकामासाठी CSR निधीतून विशेष सहाय्य देण्यात येईल, असे घुगे यांनी सांगितले.
वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण असल्याने अजनूप गावातून दोन टप्प्यांमध्ये लिफ्टिंगद्वारे पाणीपुरवठा करण्याचा आराखडा तयार करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. संबंधित पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत.
शासकीय शाळा व अंगणवाडीची इमारत अद्याप उभारली गेलेली नसून, बांधकाम साहित्य पोहोचण्यात अडचणी येत असल्यामुळे ही कामे प्रलंबित आहेत. या कामांना गती देण्यासाठी गटशिक्षणाधिकारी शहापूर यांना तातडीचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळा, अस्नोली येथे भेट देऊन नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांच्या क्रीडाविषयक आवडींचा विचार करून बॅडमिंटन साहित्य भेट दिले. या थेट दौऱ्यामुळे स्थानिक पातळीवर प्रशासनाच्या सजगतेबाबत विश्वास निर्माण झाला असून, यामुळे आगामी काळात विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.
"शासनाच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. दौऱ्यांमधून थेट संवाद साधून अडचणी सोडवणे ही आमची जबाबदारी आहे. रस्ते, पाणी आणि घरकुलाच्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू."
— रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे