तांदुळवाडी ( जि. जळगाव) : विठ्ठल_नामाची_शाळा_भरली... शिक्षणाच्या_एकादशवारीतून, अवघी_पंढरी_अवतरली” या घोषवाक्याखाली रविवारी कै. यादव दगडू पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तांदुळवाडी येथे आषाढी एकादशीनिमित्त आगळ्या-वेगळ्या पद्धतीने दिंडीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे सूत्रधार प्राचार्य स्वप्निल आर. निकम होते.
या 'दिंडी'चा उद्देश केवळ धार्मिक नसून, वृक्ष, ग्रंथ, समता, स्वच्छता, पर्यावरण, ज्ञान, साक्षरता, भक्ती, शक्ती आणि एकता या अकरा संकल्पांची एकत्रित जागृती विद्यार्थ्यांमध्ये घडवण्याचा होता. प्राचार्य स्वप्निल निकम यांच्या हस्ते दिंडीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकरी वेशात, टाळ-मृदंगाचा गजर करीत, लेझीम पथक, नृत्य, घोषणा आणि विविध सादरीकरणांतून संपूर्ण गावातून आमचे प्रति-पंढरपूर म्हणजे तांदुळवाडी मठ वस्ती येथे पालखी घेऊन जात वारी साजरी केली.
यावेळी विद्यार्थिनी दिव्या पाटील आणि दर्शना पाटील यांनी विठ्ठल-रुक्मिणीचे वेश परिधान केले होते. सोहम अमोल पाटील याने संत तुकारामांची भूमिका साकारून वारकरी संप्रदायाचा सार विद्यार्थ्यांमध्ये रुजवला. दिंडीत सहभागी काही विद्यार्थ्यांनी स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन यावर जनजागृतीपर घोषणा केल्या. तर काहींनी भक्ती आणि शक्तीचे अर्थ सांगणारी नाट्यप्रदर्शने सादर केली. फुगडी, पारंपरिक नृत्य, लेझीम आणि ढोल-ताशाच्या गजरात गावातील वातावरण संपूर्ण वारीमय झाले होते.
दिंडीचा समारोप तांदुळवाडी मठ वस्ती येथे करण्यात आला. यावेळी प्राचार्य स्वप्निल निकम यांनी ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत वडाच्या झाडाचे स्वहस्ते रोपण केले आणि सर्व पालक, विद्यार्थी यांना “प्रत्येकाने एक झाड लावा व त्याचे संगोपन करा” असे आवाहन केले. वडाच्या झाडाच्या पारंब्यांवर सूर मारण्याचा आनंदही विद्यार्थ्यांनी लुटला. मुलींनी देखील या आनंदात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी साक्षरता, पर्यावरण, आणि सामाजिक जबाबदारीवर जोर देणाऱ्या घोषणांनी गावभर जनजागृती केली.
कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेने सामाजिक बांधिलकी आणि शिक्षणाचे संवेदनशील दर्शन घडवत एक आदर्श पंढरपूर दिंडी उभारली.