शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचे निर्देश
मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि सुरक्षितता या बाबी अत्यंत महत्त्वाच्या असून, धोकादायक शाळा इमारतींचे तातडीने सर्वेक्षण करून त्या ठिकाणी आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले आहेत.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा इमारतींची सद्यस्थिती तपासण्यासाठी मंत्रालयात डॉ. भोयर यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीस प्रधान सचिव रणजितसिंह देओल, उपसचिव समीर सावंत प्रत्यक्ष उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीद्वारे शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, समग्र शिक्षण प्रकल्पाचे संचालक संजय यादव, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी तसेच राज्यातील सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी सहभागी झाले होते.
राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी स्पष्टपणे सांगितले की, “शाळा ही विद्यार्थ्यांसाठी केवळ शिक्षणाचे केंद्र नसून, ती त्यांचं दुसरं घर असतं. त्यामुळे त्या इमारतींची रचना मजबूत आणि सुरक्षित असणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात न घालता, अशा धोकादायक इमारतींचे तातडीने सर्वेक्षण करून कार्यवाही सुरू करावी.”
या बैठकीत सर्व जिल्ह्यांमध्ये शाळा इमारतींचे सर्वेक्षण करून धोकादायक, जीर्ण व अर्धवट इमारतींची यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच अशा ठिकाणी दुरुस्ती, नव्याने इमारत उभारणी किंवा पर्यायी व्यवस्था करून विद्यार्थ्यांचे स्थलांतर यासंदर्भातील कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले.
शाळांमध्ये स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, मजबूत छत, संरक्षक भिंती, योग्य प्रकाशव्यवस्था, बसण्याची सुरक्षित जागा या मूलभूत सुविधांची पूर्तता करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीचा योग्य समन्वय साधून त्वरित अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी सांगितले.
या बैठकीत प्रत्येक जिल्ह्यातील शाळा इमारतींची स्थिती, संभाव्य धोके आणि पुढील उपाययोजना यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा होईल, असा विश्वास राज्यमंत्री भोयर यांनी व्यक्त केला.
