माजी खासदार राजन विचारे यांची पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्याशी विशेष भेट
मीरा-भाईंदर : मीरा-भाईंदर शहराचे नवीन पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून, त्यांच्या नियुक्तीचा परिसरात सकारात्मक प्रतिसाद उमटत आहे. गुरुवारी (२३ जुलै) माजी खासदार राजन विचारे (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी त्यांची सदिच्छा भेट घेत त्यांचे अभिनंदन केले आणि शहराच्या सुरक्षेविषयी व सामाजिक प्रश्नांबाबत चर्चा केली.
मीरा-भाईंदर शहरातील दुकानदार शालेय विद्यार्थ्यांना व्यसनाच्या जाळ्यात अडकवत आहेत. संबंधित विक्रेते अवैध पद्धतीने इलेक्ट्रिक सिगरेट्स अल्पवयीन मुलांना विकत असून, यामुळे तरुणाई व्यसनाधीनतेच्या कचाट्यात सापडण्याचा धोका वाढतो आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीस यंत्रणांनी गुप्त माहिती संकलन, दुकानदारांवर कारवाई, आणि जनजागृती यावर भर द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
भारतात इलेक्ट्रिक सिगरेट्स विक्री, साठवणूक आणि जाहिरात करण्यावर बंदी असतानाही काही विक्रेते हे उत्पादने चोरीछुपे पद्धतीने उपलब्ध करून देत आहेत. पालकांमध्ये यामुळे चिंतेचे वातावरण असून, विद्यार्थ्यांचे आरोग्य, भविष्य आणि मानसिक विकास यावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.
या भेटीला नरेश मनेरा (संपर्कप्रमुख), प्रभाकर म्हात्रे (जिल्हाप्रमुख, मीरा-भाईंदर), मनोज मयेकर (उपजिल्हाप्रमुख), नीलम धवन (महिला आघाडी) आणि प्रकाश जैन हे देखील उपस्थित होते. सर्वांनी पोलीस प्रशासनाशी सुसंवाद साधत अशा प्रकारांवर आक्रमक आणि धडक कारवाईचे आवाहन केले.
पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनीही यावेळी या विषयाची गंभीर दखल घेत यासंबंधी सखोल माहिती घेऊन लवकरच कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.

