केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सकारात्मक प्रतिसाद
भिवंडी : मौजे लामज येथील मुंबई-बडोदा एक्स्प्रेस हायवेवर (Mumbai-Vadodara Expressway) एन्ट्री व एक्झिट पॉईंटची गरज असल्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक करत होते. या संदर्भात सविस्तर प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेला असून, आता त्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे संकेत आहेत.
गुरुवारी याच विषयावर खासदार सुरेश म्हात्रे ( बाळ्या मामा) यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली. या बैठकीत प्रस्तावाची सविस्तर माहिती देण्यात आली. गडकरींनी या मागणीवर त्वरित सकारात्मक विचार करत लवकर निर्णय होईल, असे आश्वासन दिले.
लामज गावाजवळून जाणाऱ्या या हायवेवर एन्ट्री व एक्झिट पॉईंट उपलब्ध झाल्यास भिवंडी, कल्हेर, कशेली, अंजूर, लामज आणि आजूबाजूच्या गावांना वाहतूक दृष्टीने मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे स्थानिकांना मुंबई, ठाणे, गुजरात मार्गांवर सहज प्रवास करता येईल, तसेच वाहनांची गती वाढेल आणि आर्थिक व्यवहारांनाही चालना मिळेल.
या मागणीसाठी स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी व स्थानिक स्वराज्य संस्थांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. आता केंद्रीय स्तरावरून मिळालेल्या प्रतिसादामुळे उद्योगधंद्यांना चालना, ट्राफिक दडपण कमी होणे आणि वेळेची बचत अशी बहुपरिणामी सकारात्मकता अपेक्षित आहे.
"भिवंडी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी हे पॉईंट्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. मी स्वतः केंद्रीय मंत्र्यांसोबत चर्चा करून हा प्रस्ताव लवकर मंजूर होईल यासाठी प्रयत्नशील आहे."
- सुरेश म्हात्रे, खासदार