जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन
इफकोच्या ‘नॅनो खते शेतकरी जागृती व्हॅन’चे उद्घाटन
जळगाव : शाश्वत शेतीसाठी पारंपरिक रासायनिक खतांऐवजी अधिक कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक नॅनो खतांचा वापर वाढवावा,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
इफको संस्थेच्या ‘नॅनो खते शेतकरी जागृती मोहीम व्हॅन’ चे उद्घाटन गुरुवारी जळगाव येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पार पडले.
या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पद्मनाभ मस्के, जिल्हा गुणनियंत्रक अधिकारी बोरसे, इफकोचे जिल्हा प्रबंधक संदीप रोकडे आणि इतर अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी यावेळी सांगितले की, "खरीप हंगामातील पिके सध्या फवारणीच्या अवस्थेत असून शेतकऱ्यांनी पारंपरिक खतांऐवजी नॅनो युरिया व नॅनो डीएपी यांचा वापर करावा. हे खते केवळ कार्यक्षमच नाहीत तर पर्यावरणासाठीही सुरक्षित आहेत."
पारंपरिक युरियाच्या अति व शास्त्रशुद्ध नसलेल्या वापरामुळे जमिनीची गुणवत्ता कमी होते, भूजलातील नायट्रेटची पातळी वाढते आणि लिचिंगसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. युरियाच्या विघटनातून तयार होणारे अमोनिया व नायट्रस ऑक्साईड वायू हवेत मिसळून पर्यावरण प्रदूषण घडवतात. इफकोने विकसित केलेल्या नॅनो युरिया या द्रवरूप खतात २०% नत्र असतो. त्याचे अतिसूक्ष्म कण पानांमधील पेशींमध्ये शोषले जाऊन पिकाच्या गरजेनुसार हळूहळू कार्य करतात. पारंपरिक युरियाची कार्यक्षमता केवळ २५–३०% इतकी असते, तर नॅनो युरिया ही कार्यक्षमता ९०% पर्यंत पोहोचवतो.
"केंद्र सरकारने अधिकृत मान्यता दिलेल्या नॅनो युरियाचा वापर वाढवून पारंपरिक युरियाचा वापर किमान ५०% कमी करण्याची आवश्यकता आहे. हे पाऊल केवळ पीक उत्पादनासाठीच नाही तर पर्यावरणसुधारणा आणि भूजल संवर्धनासाठीही महत्त्वाचे ठरेल," असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. ही जागृती व्हॅन जळगाव जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांमध्ये नॅनो खतांविषयी माहिती व जनजागृती करणार आहे.
