विद्यार्थ्यांना शिक्षक मिळणार

Maharashtra WebNews
0

 


 अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन सुरू 

मुंबई :  शिक्षक भारती संघटनेच्या सातत्यपूर्ण मागण्या आणि संघर्षानंतर अखेर मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन सुरू झाले आहे. या निर्णयामुळे गेल्या तीन महिन्यांपासून शिक्षक टंचाईचा सामना करणाऱ्या पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना अखेर शिक्षक मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबईतील अनेक शाळांमध्ये विद्यार्थीसंख्येच्या तुलनेत शिक्षकांची टंचाई निर्माण झाली होती. काही वर्गांमध्ये एका शिक्षकावर ६०-७० विद्यार्थ्यांचा भार येत होता. यामुळे अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होत नव्हता आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर परिणाम होत होता. या समस्येवर उपाय म्हणून पालिकेच्या शिक्षण विभागाने अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन सुरू केले आहे.


शिक्षण विभागाने सुरुवातीला अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन मुंबईबाहेर करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र याला शिक्षकांनी तीव्र विरोध दर्शवला. शिक्षक भारतीने १ मे रोजी झालेल्या बैठकीत स्पष्ट केले होते की कोणीही मुंबईबाहेरील समायोजन घेऊ नये आणि संघर्षासाठी तयार राहावे. त्यानंतर २ मे रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालयात जमून शिक्षकांनी मुंबईबाहेरील समायोजनाला लेखी नकार दिला होता.


समायोजन न स्वीकारलेल्या अतिरिक्त शिक्षकांचे वेतन तीन महिने बेकायदेशीरपणे बंद करण्यात आले होते. या काळात शिक्षकांना मानसिक त्रास सहन करावा लागला तसेच मोठे आर्थिक नुकसानही झाले. शिक्षक भारतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयात झालेल्या बैठकीत मुंबईतील शिक्षकांचे मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील सुमारे ७०० रिक्त पदांवर तात्पुरते समायोजन करण्याची मागणी केली होती. अखेर या मागणीला तत्त्वतः मंजुरी देत पालिकेने समायोजन कॅम्पचे आयोजन केले आहे. या प्रक्रियेमुळे शिक्षकांचा तुटवडा कमी होऊन वर्गशिक्षण सुरळीत होणार आहे.


पालिका शिक्षण विभागाच्या मते, या समायोजन प्रक्रियेत ज्या शाळांमध्ये विद्यार्थीसंख्या कमी असून शिक्षक जास्त आहेत, त्या शाळांमधून शिक्षकांना विद्यार्थीसंख्या जास्त असलेल्या शाळांमध्ये हलवले जात आहे. शिक्षकांचे कार्यकाळ, विषयानुसार उपलब्धता आणि संबंधित शाळेचा प्रकार यांचा विचार करून हे पुनर्वाटप केले जात आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)