डोंबिवली \ शंकर जाधव : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदी जालिंदर पाटील यांची बिनविरोध निवड झाली. विशेष म्हणजे सभापती व उपसभापती या दोन्ही पदावर भाजपाने शिक्कामोर्तब करत बाजार समितीवर महायुतीचा झेंडा फडकवला.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा संचालक पदाच्या जागांसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महायुतीच्या भाजप शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाने एक हाथी सत्ता काबीज केली. निवडणूक निर्णय अधिकारी विशाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती व उपसभापती पदाची निवडणूक घेण्यात आली. उपसभापती पदासाठी जालिंदर पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
उपसभापती जालिंदर पाटील हे या पूर्वी दोन टर्म कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळावर निवडून आले होते व नुकत्याच पार पडलेल्या संचालक पदाच्या निवडणुकीत तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. दरम्यान जालिंदर पाटील यांनी सांगितले की, स्वच्छतेच्या मुद्द्यावर प्रकर्षाने लक्ष देत कृषी उत्पन्न समितीच्या अंतर्गत जी काही कामे राहून गेली असतील ती पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न आम्ही करू. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न व इतर मागण्या आम्ही भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्याने निश्चित पूर्ण करण्याच्या प्रयत्न करणार. महायुतीच्या माध्यमातून काम होण्यास कोणतीही अडचण येणार नाही असेही जालिंदर पाटील यांनी सांगितले.