रोटरी क्लब ऑफ दिवा- ठाणे यांचा उपक्रम
दिवा \ आरती परब : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने दिवा येथील विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच अनुषंगाने रोटरी क्लब ऑफ दिवा- ठाणे यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले, ज्याला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या शिबिरात ६३ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. दिवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र तोरडमल यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लब ऑफ दिवा- ठाणेचे अध्यक्ष किशोर पाटील, सचिव स्वप्निल गायकर, तसेच प्रकल्प प्रमुख नंदकुमार किणे यांनी विशेष मेहनत घेतली.
या उपक्रमास विकास गुंजाळ, हर्षद भगत, साईनाथ म्हात्रे, अभिजीत आलीमकर, अभिजीत ठाकूर, गणेश टावरे, नवनीत पाटील, वैष्णव पाटील, महेंद्र दळवी यांच्यासह अनेक नागरिकांची उपस्थिती लाभली. रोटरी क्लब ऑफ दिवा- ठाणे अध्यक्ष किशोर पाटील यांनी यावेळी रक्तदाते, विठ्ठल मंदिर सेवा समिती व क्लब सदस्यांचे आभार मानून पुढील काळातही असे उपक्रम राबवण्याचे आश्वासन दिले.