सन २०१० पासून सुरु झालेली शाळेची पंढरीची वारी (दिंडी) ही एक विशेष परंपरा बनली आहे. यावर्षी दिंडी शाळेपासून निघून विठ्ठल- रुक्मिणी मंदिर, दातिवली रोड, दिवा येथे विठ्ठल भगवान व रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी पोहोचली.
या पवित्र वारीमध्ये शाळेचे विद्यार्थी, शिक्षकवर्ग, मुख्याध्यापक पारंपरिक वेशभूषेत, टाळ- मृदंगाच्या गजरात, विठ्ठलनामाचा जयघोष करीत सहभागी झाले होते. पालकवर्ग देखील या दिंडीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनेक पालकांनी सांगितले की, “पंढरपूरला प्रत्यक्ष जाता आले नाही, परंतु या शाळेच्या दिंडीत सहभागी होऊन खऱ्या अर्थाने वारीचा अनुभव घेतला.”
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे संस्थापक म्हात्रे यांनी विठ्ठल- रुक्मिणी मायबापांकडे दिव्यातील सर्व रहिवाशांचे उत्तम आरोग्य, आनंद व समृद्धीसाठी प्रार्थना केली.
या भक्तिमय व उत्साही कार्यक्रमामुळे शाळेतील वारी ही एक सामाजिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक चळवळ बनली असल्याचे सर्व स्तरातून समाधान व्यक्त केले जात आहे.