आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी उपक्रमाचा दिंडी सोहळा उत्साहात संपन्न

Maharashtra WebNews
0

 आरोग्याची वारी घरोघरी पोहोचवावी - पालकमंत्री प्रकाश आबिटकर



कोल्हापूर \ शेखर धोंगडे :  आरोग्याचे महत्त्व सर्वांना कळण्यासाठी प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्यांनी आरोग्याची वारी घरोघरी पोहोचवावी, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

       आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर येथे ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ या उपक्रमांतर्गत भव्य आरोग्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. ‘जपुया वारसा संस्कृतीचा, घेऊया आनंद आरोग्य वारीचा’ हा ध्यास घेऊन आयोजित कार्यक्रमात भक्तिगीत गायनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, अधिकारी- कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र अद्ययावत करण्यात यावेत, त्याचबरोबर त्यांच्या गरजा ओळखून, गरजेवर आधारित प्रशिक्षण देण्यावर भर देण्याची सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आरोग्य सेवक, लिपिक सेवांतर्गत परीक्षा प्रमाणपत्र वितरण सोहळा पार पडला.

   यावेळी दिंडीमध्ये सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी वारीचा आनंद घेत डेंग्यू व टीबी यांसारख्या विषयांवर पथनाट्ये सादर केली. महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत आरोग्याच्या ओव्या गायल्या. झिम्मा, फुगडी, रिंगण सोहळ्यांमध्ये आरोग्य शिक्षण देणारे फलक झळकावत जनजागृती केली. 

 प्राचार्य डॉ. योगेश साळे यांनी दिंडीमध्ये विविध अभंग रचनांचे गायन केले, तसेच प्रास्ताविकेत कार्यक्रमाची रूपरेषा विशद केली. उपस्थितांचे स्वागतही त्यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन वैद्यकीय अधिकारी डॉ. विनायक भोई आणि आरोग्य शिक्षण विस्तार अधिकारी शकिला गोरवाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी खोत (पर्यवेक्षक) आणि देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले. 





Post a Comment

0Comments

Post a Comment (0)