मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचा पारोळा तालुक्यात दौरा
जळगाव : जिल्ह्यात गुरांमध्ये वाढत्या लम्पी स्किन डिसीज (LSD) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी बुधवारी पारोळा तालुक्यातील विविध गावांना भेट देत लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत लम्पी रोगाबाबत जनजागृती केली. रोगाची लक्षणे, प्रसाराचे मार्ग आणि प्रतिबंधक उपाय याबाबत माहिती दिली. “प्राणी आरोग्य हीच खरी प्राथमिकता आहे, त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या जनावरांचे तात्काळ लसीकरण करून घ्यावे,” असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.
या दौऱ्यात पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. झोड, पारोळा गटविकास अधिकारी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. लम्पी स्किन डिसीज हा एक विषाणूजन्य रोग असून तो गुरांमध्ये त्वचेवर गाठी निर्माण होणे, ताप येणे, खाण्याची इच्छा कमी होणे अशा गंभीर लक्षणांसह आढळतो. या रोगाचा प्रसार अतिशय वेगाने होतो आणि त्यामुळे तो गुरांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरतो. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरणासोबतच गोठ्यांमध्ये स्वच्छता आणि कीटकनाशक फवारणी करणे अत्यावश्यक असल्याचे मत डॉक्टरांनी मांडले.
जिल्हा प्रशासन आणि पशुसंवर्धन विभागामार्फत विशेष लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत गावागावांतील पशुवैद्यकीय अधिकारी जनावरांची तपासणी व लस देण्याचे काम करत आहेत. नागरिकांनी मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लवकरात लवकर LSD मुक्त जळगाव घडवण्यासाठी प्रयत्न सुरू असून, या मोहिमेला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
शेतकरी बांधवांना प्रशासनाच्या सूचना
🔹 जनावरांचे तात्काळ लसीकरण करून घ्या
🔹 गोठ्यात स्वच्छता राखा
🔹 रोग नियंत्रणासाठी फवारणी करणे बंधनकारक करा
🔹 आपल्या गावातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी नियमित संपर्क साधा.