मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांच्याकडून ग्रामीण गृहनिर्माण योजनेचा सखोल आढावा
धुळे : जिल्हा परिषद धुळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सविता तेजराव नरवाडे (भा. प्र. से.) यांनी बुधवारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (DRDA) अंतर्गत ग्रामीण गृहनिर्माण योजनांचा सखोल आढावा घेतला. या बैठकीत २०१६ पासून अपूर्ण असलेल्या घरांच्या पूर्णतेसाठी तातडीने उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. तसेच नवीन घरे मंजूर करण्याच्या व त्यांचे बांधकाम वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय प्रक्रियेस गती देण्याचे निर्देश देण्यात आले.
बैठकीला जिल्ह्यातील सर्व ग्रामीण गृहनिर्माण अभियंते (Rural Housing Engineers – RHEs) उपस्थित होते. त्यांनी आपापल्या क्षेत्रातील प्रगती, अडचणी आणि स्थानिक पातळीवरील अडथळे मांडले. या अनुषंगाने श्री. नरवाडे यांनी अधिकाऱ्यांना "मिशन मोड" मध्ये कार्य करण्याचे निर्देश दिले आणि सांगितले की, अपूर्ण घरांच्या पूर्णतेस विलंब करणाऱ्या अडथळ्यांचा त्वरित निपटारा करून सर्व पात्र लाभार्थ्यांना वेळेत घरे मिळवून द्यावीत.
यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक महेश पाटील, भावना पाटील आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. नरवाडे यांनी फील्ड स्टाफच्या कार्याचे कौतुक करताना त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे स्वागत केले. त्यांनी दैनंदिन कामकाजात तांत्रिक साधनांचा अधिक प्रभावी वापर, MIS प्रणालीद्वारे अचूक रिपोर्टिंग आणि लाभार्थ्यांशी थेट संवाद यावर भर देण्याचेही निर्देश दिले.
अध्यक्षस्थानी असलेल्या श्री. नरवाडे यांनी प्रशासनाच्या "घर सर्वांचे – घर संपूर्ण" या संकल्पाचे पुनरुच्चार करत सांगितले की प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), रमाई आवास योजना आणि शबरी आवास योजना यांचा लाभ प्रत्येक पात्र ग्रामीण कुटुंबापर्यंत पोहोचवणे हेच ध्येय आहे. कोणतेही पात्र कुटुंब घरविना राहू नये, यासाठी प्रशासन पूर्णतः कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Tags : #ZPDhule #DRDADhule #DhuleZilhaParishad #TeamDhule #CEODhule #SmartAdministration #MissionMode