दिवा भाजप शिष्टमंडळाची आ. राजेश मोरे यांच्याकडे मागणी
दिवा \ आरती परब : दिवा शहरातील स्टेशन परिसरातील एकेकाळचा प्रख्यात तलाव हा आज मृतावस्थेत असून, त्याचे तातडीने स्वच्छता आणि सुशोभीकरणासाठी दिवा भाजप शिष्टमंडळाने महायुतीचे स्थानिक आमदार राजेश मोरे यांची भेट घेतली आणि तत्काळ निधी मंजूर करण्याची मागणी केली.
सदर तलाव काही दशकांपूर्वी संपूर्ण दिवा शहराचा मानबिंदू होता. गणेशोत्सवातील मूर्ती विसर्जनापासून ते घरगुती धार्मिक विधीपर्यंत विविध उपक्रम येथे पार पडत असत. मात्र गेल्या १७- १८ वर्षांत या तलावाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. परिसरात अनधिकृत गाळ्यांचे अतिक्रमण, मच्छी विक्रेते व भाजी विक्रेत्यांनी केलेली घाण, कचरा उघड्यावर टाकल्याने तलावाशेजारी ढिग जमा होत आहेत. त्यामुळे तलाव आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर अस्वच्छतेच्या गर्तेत सापडला आहे. स्थानिक नागरिकांना व विशेषतः स्टेशनवरून प्रवास करणाऱ्यांना दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर दिवा भाजप शिष्टमंडळाने आमदार राजेश मोरे यांची भेट घेऊन तलावाचे सौंदर्यीकरण व स्वच्छतेसाठी विशेष निधी मंजूर करण्याचे निवेदन सादर केले. गणेशोत्सव जवळ आल्याने विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
या बैठकीत आमदार मोरे यांनी सकारात्मक भूमिका घेत, लवकरच आवश्यक निधी उपलब्ध करून तलावाचे सुशोभीकरण सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
