अधिकृत शाळेने कांदळवनाची कत्तल करून उभारली अनधिकृत इमारत

Maharashtra WebNews
0


दिवा \ आरती परब  : ठाणे जिल्ह्यात अनधिकृत शाळांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच दिवा शहरातील विकास म्हात्रे गेट परिसरातील ‘ड्यू ड्रॉप स्कूल’ने केलेल्या कारवाईमुळे पर्यावरण आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ‘श्री जयवंत एज्युकेशन अँड मेडिकल ट्रस्ट’ने कांदळवनाची सर्रास कत्तल करत तब्बल ३४४ ब्रास भराव टाकून तळमजला + ४ मजली अनधिकृत इमारत उभारली आहे. या गंभीर प्रकरणी तहसील कार्यालयाने संबंधितांवर ३६,७१,१६८ रुपयांचा दंड ठोठावला असून, विहित मुदतीत रक्कम न भरल्यामुळे सदर ७/१२ उताऱ्यावर बोजा नोंदवण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


विशेष म्हणजे, या अनधिकृत शाळा इमारतीवर नोव्हेंबर २०२३ मध्ये दिवा प्रभाग समितीचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त अक्षय गुडधे यांनी थेट १५ दिवसांत बांधकाम हटवण्याची अंतिम नोटीस बजावली होती. मात्र त्यानंतरही आजतागायत कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने महापालिका प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. कारवाईऐवजी केवळ कागदी घोडे नाचवले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.


सदर इमारत लोखंडी चॅनेलवर उभारलेली असून लोडबेरिंग स्वरूपाची आहे. त्यामुळे ती रचना अतिशय असुरक्षित असून, या ठिकाणी हजारो विद्यार्थी रोज शिक्षणासाठी येतात हे लक्षात घेता, त्यांच्या जीवाशी थेट खेळ सुरू असल्याची टीका होत आहे. एवढे असूनही शिक्षण विभागाकडून या शाळेला मान्यता कशी देण्यात आली? असा थेट सवाल जनसेवा व पर्यावरण संरक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी उपस्थित केला आहे.


या संपूर्ण प्रकाराकडे पालिका आणि इतर संबंधित विभागांनी डोळेझाक केली असून, अनधिकृत शाळा चालू देणे म्हणजे कायद्याचा आणि पर्यावरणाचा स्पष्ट अपमान आहे. एकीकडे सरकारने पर्यावरण रक्षणासाठी कडक कायदे लागू केलेले असताना, दुसरीकडे सरकारी यंत्रणांच्याच नजरेसमोर अशा प्रकारची उघडपणे अंमलबजावणी होणं हे गंभीर बाब मानली जात आहे.


पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी याप्रकरणी दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून त्वरित शाळा स्थलांतरित करावी, अनधिकृत इमारत पाडण्यात यावी आणि पर्यावरण नष्ट करणाऱ्यांवर ठोस कारवाई करावी, अशी तीव्र मागणी केली आहे.


Tags : #UnauthorizedSchool #MangroveDestruction #DivaEncroachment #ThaneNews #StudentSafety #EnvironmentalViolation #RajendraPatil #MunicipalNegligence #DewDropSchoolIssue




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)