खरोखर विकास केला असेल तर दाखवा, आपण नागरी सत्कार करू

 


भिवंडीच्या विकासावरून कपिल पाटील यांची टीका 

कल्याण / शंकर जाधव
भिवंडी लोकसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षांत आपण हजारो कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. विद्यमान खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी जर गेल्या एका वर्षात इतकीच विकासकामे केली असतील, तर ती दाखवून द्यावीत – आपण त्यांचा नागरी सत्कार करू, असा टोला माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी लगावला.

पाटील भिवंडी लोकसभा क्षेत्रातील दहा वर्षांच्या कामगिरीचा आढावा देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांनी कल्याण मेट्रो, सुभाष मैदानातील प्रस्तावित इनडोअर स्टेडियम, नवी मुंबई विमानतळाचे दि. बा. पाटील नामकरण, स्मार्ट सिटीअंतर्गत सॅटीसचे काम, तसेच भिवंडी-वाडा महामार्गाची दुरवस्था, याबाबत सविस्तर माहिती दिली.


"आपण  २८ ते  २९ हजार कोटींची कामे मंजूर केली आहेत. ती कामे प्रत्यक्ष सुरू असून त्यांचे पुरावे आहेत. मात्र कोणी जर एका वर्षात इतकी कामे केली असे सांगत असेल, तर त्याने निदान दोन-चार कामे तरी दाखवावीत," असे सांगून त्यांनी विद्यमान खासदारांवर नाव न घेता टीका केली.

 

कल्याण मेट्रो रखडली कारण तत्कालीन सरकार उदासीन

भिवंडी ते कल्याण मेट्रो प्रकल्पातील 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र कल्याणच्या दिशेने येणारी मेट्रो तत्कालीन आघाडी सरकारच्या दुर्लक्षामुळे रखडल्याचा आरोप कपिल पाटील यांनी केला. "कल्याण व भिवंडी यांचे डीपीआर मंजूर करण्यास आघाडी सरकार तयार नव्हते. पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही डीपीआर मंजूर केल्याने कल्याण मेट्रो प्रकल्पाला गती मिळणार," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


भिवंडी-वाडा महामार्गावरील भ्रष्टाचार चौकशीस पात्र

भिवंडी-वाडा रस्त्याची दुरवस्था ही गंभीर बाब आहे. या रस्त्यावर आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला असून अनेकांना अपंगत्व आले आहे. काही संस्थांनी जिजामाता यांचे नाव वापरून बोगस कामे केली आहेत. "राजमाता जिजामाता हे नाव पवित्र आहे, त्याचा गैरवापर करणाऱ्या संस्थांची चौकशी व्हावी," अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याचे सांगितले.


शेवटी एकच सवाल – विकास केला की केवळ घोषणा?

कपिल पाटील यांच्या या विधानातून एक स्पष्ट संदेश दिला गेला – केवळ निवडणुकीच्या तोंडावर विकासाच्या घोषणा करून जनतेला फसवू नका. प्रत्यक्षात काम केले असेल तर दाखवा. अन्यथा जनतेच्या न्यायालयात त्याचे उत्तर द्यावे लागेल, असा सजग इशाराच त्यांनी दिला.




Post a Comment

Previous Post Next Post