भुदरगड तालुक्यातील सात धबधबे म्हणजे अद्भुत खजाना

Maharashtra WebNews
0


 पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे प्रतिपादन 

कोल्हापूर \ शेखर धोंगडे : भुदरगड तालुक्यातील दोनवडे, नितवडे, खेडगे, एरंडपे या गावांमध्ये असलेले एकाच परिसरातील सात नैसर्गिक धबधबे म्हणजे निसर्गाचा एक अद्भुत खजाना असून, येथे वर्षाविहार, जंगल, जल, शेती आणि निसर्गसंपत्तीचा अनुभव एकत्रित मिळतो, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.


सवतकडा धबधबा परिसरात ३.४४ कोटी रुपयांच्या सुशोभीकरण आणि विकासकामांचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रकल्पाअंतर्गत पर्यटनासाठी मूलभूत सुविधा, मार्गदर्शक फलक, विश्रांतीसाठी संरचना, तसेच सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.



लोकार्पणानंतर पालकमंत्री आबिटकर यांनी विविध धबधबे आणि परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी पर्यटकांशी संवाद साधत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. ग्रामस्थ आणि वन विभागाशी चर्चा करताना त्यांनी पर्यटनस्थळाच्या स्वच्छता व्यवस्थापनावर विशेष भर देण्याचे निर्देश दिले.


हा प्रकल्प केवळ पर्यटनदृष्ट्या नव्हे तर स्थानिक अर्थव्यवस्था, ग्रामविकास व रोजगारनिर्मितीला चालना देणारा ठरणार आहे, असेही आबिटकर यांनी नमूद केले. या यशस्वी अंमलबजावणीसाठी तत्कालीन मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजन आणि तत्कालीन उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांचे विशेष योगदान राहिले.


कोल्हापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे, गारगोटी वनक्षेत्रपाल अविनाश तायनाक, पर्यटन अभ्यासक बाबा नांदेकर, तसेच संबंधित गावांमधील संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.



पर्यटन कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

या वेळी कोल्हापूर वन विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या “सवतकडा पर्यटन कॉफी टेबल बुक” चे प्रकाशनही पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. या पुस्तकात परिसरातील नैसर्गिक सौंदर्य, जैवविविधता व स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले आहे.


“सवतकडा धबधब्याचा विकास ही निसर्ग पर्यटन आणि स्थानिक विकास यामधील एक सकारात्मक पाऊल आहे. हे ठिकाण लवकरच कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला येईल,” असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.




Tags : #BhudargadTourism #SawatkadaWaterfall #PrakashAbitkar #KolhapurNatureSpots #MaharashtraTourism #EcoDevelopment #ForestDepartment #KolhapurUpdates #WaterfallBeauty #TourismInMaharashtra






Post a Comment

0Comments

Post a Comment (0)