नवी मुंबई : कोपरखैरणे, तुर्भे, घणसोली आणि वाशी परिसरातील झोपडपट्टीसदृश वस्त्यांमध्ये गरजेपोटी बांधलेली घरे तोडण्याच्या नोटीसा नवी मुंबई महापालिकेने बजावल्यानंतर प्रकल्पग्रस्त नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)च्या वतीने नवी मुंबई महापालिका व सिडकोवर धडक मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात मोठ्या संख्येने कष्टकरी, गोरगरीब महिला आणि तरुण सहभागी झाले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे शशिकांत शिंदे यांनी सिडकोने अल्पभूधारक योजनेतून लॉटरीच्या माध्यमातून काही लोकांना ५० ते ८१ लाख किमतीची घरे दिली. मात्र, प्रत्यक्षात अनेक गरिबांना अजूनही हक्काचे घर मिळाले नसल्याचा आरोप केला.
तसेच "गरिबांना कमी दरात घरे मिळावीत यासाठी हा लढा आहे. प्रकल्पग्रस्तांच्या वतीने हा मोर्चा काढण्याचे धाडस राष्ट्रवादी शरद पवार गटाने दाखवले आहे. आमच्या शिष्टमंडळाला प्रशासनाशी चर्चा करायला पाठवले जाईल. चर्चा निष्फळ ठरल्यास पुढची आक्रमक रणनीती तयार असून आता माघार नसल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, "नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे आजपर्यंत कुणीही गांभीर्याने पाहिले नाही. घरं पाडण्याच्या नोटीसा देऊन प्रशासनाने केवळ अन्यायच केला आहे. गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, मग आम्हीही तयार आहोत. आमची घरे नियमित करा, आम्ही त्यासाठी लागणारे कर भरायला तयार आहोत."
मोर्चात सहभागी झालेल्यांनी प्रशासनावर सवाल केला, "नवी मुंबई मनपा आणि सिडकोला गरिबांकडूनच पैसा उकळायचा आहे का? बिल्डरांना सूट आणि गरीबांची लुट? हजारो कोटींचे घर प्रकल्प बुडवले गेले, हेच का नियोजन?"मोर्चाच्या माध्यमातून सिडको व मनपाच्या भूमिकेवर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून, "गरीबांच्या घरांवर कारवाई थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन सुरू होईल," असा इशारा यावेळी देण्यात आला.