एसटी बस नाल्यात पलटी; एक ठार

Maharashtra WebNews
0


 ५० प्रवासी जखमी

एरंडोल : एरंडोल–कासोदा मार्गावर शुक्रवारी सकाळी एक भीषण अपघात घडला असून, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) MH 20 BL 3402 क्रमांकाच्या बसचा नाल्यात उलटून अपघात झाला आहे. ही बस एरंडोलहून भडगावकडे जात होती, दरम्यान चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस नाल्यात कोसळली.


या अपघातात एक प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, १५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे, तर ३५ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहेत.


अपघाताची माहिती मिळताच प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा तात्काळ सक्रिय झाली. घटनास्थळी तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस, अँब्युलन्स, तसेच एस.टी. महामंडळाचे अधिकारी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने बस बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.


जिल्हा प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता राखावी, तसेच मदत कार्यात सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. जखमी प्रवाशांच्या तातडीच्या उपचारासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून, त्यांच्या कुटुंबीयांशीही सतत संपर्क ठेवण्यात येत आहे.


या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, एस.टी. महामंडळाच्या वाहतुकीतील सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. घटनास्थळाजवळ मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली असून, पोलिसांकडून गर्दी नियंत्रित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.





Post a Comment

0Comments

Post a Comment (0)