कल्याण- डोंबिवली महापालिकेचा उपक्रम
कल्याण : ७९ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तसेच "हर घर तिरंगा" अभियानाचा भाग म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या "ड" प्रभागात आज देशभक्तीचा उत्साह ओसंडून वाहिला. सहा. आयुक्त उमेश यमगर यांच्या नेतृत्वाखाली तीन वेगवेगळे उपक्रम राबवून तिरंग्यास अनोखे अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला आमदार सुलभाताई गायकवाड, महापालिका आयुक्त अभिनव गोयल, उप आयुक्त संजय जाधव यांच्यासह अनेक मान्यवर, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
1000 देशी वृक्षांची लागवड
"ड" प्रभाग क्षेत्रातील स्व. बाळासाहेब ठाकरे उद्यान आणि वेस्टर्न रिजन स्कूल परिसरात विविध देशी प्रजातींच्या सुमारे 1000 वृक्षांची लागवड करण्यात आली.
100 फुटी तिरंग्यासह प्रभात फेरी
शेकडो विद्यार्थ्यांच्या सहभागाने जिरेटोप चौक – चिंचपाडा रस्ता – काटेमानिवली चौक ते "ड" प्रभाग कार्यालय या मार्गावर प्रभात फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी 100 फुटी तिरंग्यासह घोषणाबाजी करत देशभक्तीचा संदेश दिला. मॉडेल कॉलेज, साकेत कॉलेज, कमलादेवी कॉलेज, सहयोग सामाजिक संस्था, जाणिव सामाजिक संस्था आणि इतर अनेक संघटनांनी सहभाग नोंदवला.
शिवारायांच्या 12 किल्ल्यांच्या प्रतिकृती
द्वारका विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांनी युनेस्कोच्या यादीत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांच्या हुबेहुब प्रतिकृती साकारल्या. या कलाकृतींना मान्यवरांकडून विशेष दाद मिळाली.
‘हर घर तिरंगा – हर घर स्वच्छता’ पथनाट्य
सुमित एल्कोप्लास्टच्या टीमने ओला आणि सुका कचरा वर्गीकरणाचे महत्त्व पथनाट्याद्वारे प्रभावीपणे सादर केले. आमदार सुलभाताई गायकवाड यांनी या सादरीकरणाचे कौतुक केले आणि नागरिकांना कचरा वर्गीकरणाचे आवाहन केले.
शेवटी, आयुक्त अभिनव गोयल यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत, “देशभक्तीची भावना फक्त १५ ऑगस्टपुरती मर्यादित न ठेवता ती आपल्या मनामध्ये कायम जागृत ठेवावी,” असे आवाहन केले.