एसटी कर्मचारी आर्थिक संकटात



रक्षा बंधनच्या उत्पन्नातील काही हिस्सा कर्मचाऱ्यांना देण्याची मागणी

मुंबई :  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) तब्बल ९० हजार कर्मचाऱ्यांचा थकीत महागाई भत्ता आता एक हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे. अनेक महिने प्रलंबित असलेल्या या थकबाकीबाबत कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढत असून, रक्षा बंधन सणाच्या काळात महामंडळाला झालेल्या जादा उत्पन्नातील काही हिस्सा कर्मचाऱ्यांना देण्यात यावा, अशी मागणी संघटनांकडून करण्यात आली आहे.

रक्षा बंधनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे एसटीने अतिरिक्त फेऱ्या टाकल्या आणि तिकीट विक्रीतून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न झाले. कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की – “हीच योग्य वेळ असून या अतिरिक्त कमाईतून थकबाकी महागाई भत्ता देण्यात यावा.”

दरम्यान, वाढत्या महागाईमुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. कर्जफेड, घरगुती खर्च आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी पार पाडणे कठीण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

संघटनांनी महामंडळ व्यवस्थापनाला लेखी मागणी केली असून, शासनाने तातडीने या प्रश्नात हस्तक्षेप करून कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

सध्या एसटीवर तब्बल एक हजार कोटींहून अधिक थकीत भत्त्याचे ओझे आहे. त्यामुळे शासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

x

Post a Comment

Previous Post Next Post