नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस २ तास मूर्तिजापूर स्थानकावर खोळंबली
अकोला : देशातील सर्वात लांब पल्ल्याची म्हणून नुकतीच सुरू झालेली नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेस आज अकोला जिल्ह्यात तब्बल २ तास उभी राहिल्याची घटना घडली. मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर या एक्सप्रेसचा थांबा नसतानाही मालगाडीच्या खोळंब्यामुळे वंदे भारतला येथे थांबावे लागले. प्रवाशांना यामुळे मोठी गैरसोय झाली.
बोरगाव मंजू रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे कपलिंग अचानक तुटले. त्यामुळे गार्डसह काही डबे मागे राहिले, तर इंजिनसह उर्वरित डबे पुढे गेले. रेल्वे पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघाती घटनेमुळे नागपूर–मुंबई रेल्वेमार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून, पुण्याकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसलाही याचा फटका बसला.
रेल्वे प्रशासनाने तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने काही तासांत वाहतूक पूर्ववत होणार असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, अजनी (नागपूर) ते पुणे धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचे वर्धा, बडनेरा, अकोला जंक्शन, शेगांव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर आणि दौंड कॉर्डलाईन असे ठरलेले थांबे आहेत. परंतु आज मूर्तिजापूर येथे तब्बल दोन तास गाडी उभी राहिली होती. महाराष्ट्रातील ही बारावी वंदे भारत असून, नुकत्याच एका आठवड्यापूर्वी सेवेत दाखल झाली आहे.
दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर परिसरात मुसळधार पावसामुळे कास नदीला पूर आला. परिणामी, नागपूर–मुंबई जुन्या महामार्गावरील वाहतूक तब्बल चार तास ठप्प झाली होती. आता पावसाचा जोर कमी झाल्याने रस्ते वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे.