राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत यशस्वी उपचार
नांदेड : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (RBSK) नांदेड जिल्ह्यातील हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या १८ बालकांना पुढील उपचारासाठी आणि शस्त्रक्रियेसाठी मुंबईला रवाना करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.
श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयात १६ जुलै रोजी हृदयविकाराची लक्षणे असलेल्या बालकांसाठी विशेष '२डी इको' तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात अनेक बालकांची तपासणी करण्यात आली, ज्यामधून १८ बालकांना हृदय शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरवण्यात आले. या सर्व बालकांना आज राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत पुढील उपचारांसाठी मुंबईतील विशेष रुग्णालयांमध्ये पाठवण्यात आले.
या बालकांची तपासणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पांडुरंग पावडे आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने केली होती.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाने नांदेड जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गेल्या वर्षापासून आतापर्यंत या कार्यक्रमांतर्गत १२५ बालकांच्या यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त, इतर विविध आजारांवर ६३४ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तसेच, ७६ बालकांना श्रवणयंत्र उपलब्ध करून दिल्याने त्यांच्या बहिरेपणाची समस्या दूर झाली आहे.
शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये नियमित आरोग्य तपासणी करून गरजू बालकांना वेळीच औषधोपचार आणि शस्त्रक्रिया उपलब्ध करून दिल्या जात असल्याने, हा कार्यक्रम अत्यंत प्रभावी ठरत आहे. या उपक्रमामुळे पालक आणि शिक्षकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
या यशस्वी उपक्रमासाठी आरबीएसकेचे जिल्हा कार्यक्रम समन्वयक अनिल कांबळे, डीईआयसी व्यवस्थापक विठ्ठल तावडे, अनिता चव्हाण, गुनानंद सावंत तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.